"शिवसेना को फंड दिया समझके भूल जा', अशी धमकी द्यायचा शहरप्रमुख 

दिनेश यांनी मंगेश कडवला साडेबारा लाख रूपये नगदी आणि अडीच लाख रूपयांचा धनादेश दिला होता. त्यानंतर मंगेश कडव व त्याची पत्नी रूचिता या दोघांनी फ्लॅटचा ताबा देण्यास टाळाटाळ केली. सेलडीड करून न देता वारंवार चालढकल केली.
Mangesh Kadao
Mangesh Kadao

नागपूर : लुटेरी दुल्हन प्रीती दासच्या नंतर शिवसेनेचा शहरप्रमुख मंगेश कडव याच्या गुन्ह्यांच्या पापाचा घडा भरला असून तो पोलिसांच्या रडारवर आला आहे. मंगेशने एका फ्लॅटची 15 लाख रुपयांत विक्री केल्यानंतर ताबा देण्यासाठी टाळाटाळ करीत फसवणूक केली. या प्रकरणी तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी मंगेश कडव आणि त्याची पत्नी रूचिता कडव या दोघांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. "शिवसेना को फंड दिया समझके भूल जा', अशी धमकी मंगेश द्यायचा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेशच्या विरोधात अनेक तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. प्रीती दासनंतर मंगेश कडव याच्याही गुन्हेगारीचा पाढा वाचला जात आहे. आपल्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्याचे प्रकार मंगेश कडव करीत आहे. शिवसेनेचा वादग्रस्त नेता असलेला मंगेश कडव हा जीवे मारण्याच्या धमक्‍या देऊन प्रॉपर्टी हडप करीत आहे. तसेच तो सध्या गुंडगिरी करीत गुन्हेगारी जगतातसुद्धा सक्रिय झाला आहे. मंगेशविरूद्ध सध्या अंबाझरी आणि सक्‍करदरा पोलिस ठाण्यात दीड कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. तर तिसरा फसवणूकीचा गुन्हा हुडकेश्‍वरमध्ये दाखल झाला आहे. 

पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, जुना सुभेदार लेआउट येथे राहणारे दिनेश रामचंद्र आदमने आणि आरोपी मंगेश कडव आणि त्याची आरोपी पत्नी रूचिता हे एकमेकांना गेल्या सात ते आठ वर्षांपासून ओळखतात. 1 नोव्हेंबर 2013 ला दिनेश यांनी मानेवाडा रोडवरील अमरीती अपार्टमेंटमधील मंगेशचा फ्लॅट 16 लाख रूपये देऊन खरेदी केल्याचा करारनामा केला होता. दिनेश यांनी मंगेश कडवला साडेबारा लाख रूपये नगदी आणि अडीच लाख रूपयांचा धनादेश दिला होता. त्यानंतर मंगेश कडव व त्याची पत्नी रूचिता या दोघांनी फ्लॅटचा ताबा देण्यास टाळाटाळ केली. सेलडीड करून न देता वारंवार चालढकल केली. 

मंगेश कडवने मे. रामसीटी युनियन फायनान्स लिमीटेड येथे तोच फ्लॅट काही लाख रूपयांत गहाण ठेवला होता. तो फ्लॅट थेट पत्नी रूचिता कडव हिच्या नावावर सेलडीड करण्यात आला. दिनेश यांनी पैसे परत मागितले असता मंगेश कडव धमक्‍या द्यायला लागला. शिवसेना नेता असल्याचे सांगून दमदाटी करायला लागला. 15 लाख रूपये परत देण्याचे आमिष दाखवून दिनेश यांना पाच लाख रूपयांचा बॅंक ऑफ महाराष्ट्राचा चेक दिला. मात्र, तो चेक घेऊन दिनेश बॅंकेत गेले असता मंगेशने बॅंकमध्ये स्टॉप पेमेंटचा अर्ज केला. त्यामुळे दिनेश यांना पैसे मिळू शकले नाही. अशाप्रकारे दिनेश आदमने यांची पाच लाखांनी फसवणूक केली. 

जीवे मारण्याची दिली धमकी 
दिनेश आदमने हे मंगेश कडव याच्या बजाजनगरातील कार्यालयात गेले. मंगेशला पैसे परत मागितले असता "शिवसेना पार्टी फंड दिया समजके अब तू पैसे भूल जा... पैसे वापस चाहिये या जान प्यारी हैं' अशी धमकी मंगेश कडवने दिली. त्यामुळे घाबरलेले दिनेश परत आले. त्यानंतर मंगेशने दिनेश यांना अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com