the first teacher in the district to work on the kovid survey is dead today | Sarkarnama

कोविड सर्वेचे काम करणारा शिक्षक दगावला, जिल्ह्यातील पहिला शिक्षक

अजय धर्मपुरीवार
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

रामदास काकडेसुद्धा या सर्वेक्षणात सहभागी असताना गेल्या आठ दिवसांत त्यांची प्रकृती बरी नव्हती. यासंदर्भात हिंगणा तहसील यंत्रणेला कळविले होते, मात्र काम करावेच लागेल, असे फर्मान देण्यात आले. यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

हिंगणा (जि. नागपूर) : कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर काहीच दिवसांत जिल्ह्यातील शिक्षकांना कोविड-१९ सर्वेच्या कामावर लावण्यात आले. त्यासाठी ज्या बैठका घेतल्या तेथे कोणतीही सुरक्षेची साधने किंवा सोशल डिस्टंसिंग नव्हते. गावांमध्ये प्रत्यक्ष सर्वे करतानाही शिक्षकांना आवश्‍यक सुरक्षा साधने पुरविण्यात आली नव्हती. प्रस्तुत प्रतिनिधीने स्वतः याचा अनुभव घेतला आहे. त्याचे परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे. ५१ वर्षीय रामदास काकडे या शिक्षकाचा आज पहाटे कोरोनामुळे मृत्यू झाला. रामदास हे सर्वे करणाऱ्या शिक्षकांमधून कोरोनाचा पहिला बळी ठरले आहेत. 
 
हिंगणा तालुक्यात कोवीड १९ सर्वेक्षणाच्या कामात असणाऱ्या शिक्षकांना कोरोनाची लागण होत आहे. मात्र, याकडे नागपूर जिल्हा प्रशासन व शिक्षण विभाग हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून शिक्षकांना कोरोनाच्या सर्वेक्षणाच्या कामात बळजबरीने लावत आहे. डिगडोह येथील बालाजी हायस्कूलमध्ये रामदास काकडे शिक्षक कार्यरत होते. हिंगणा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या निर्देशानुसार तहसीलदार संतोष खांडगे यांनी अनेक शिक्षकांना कोरोना  सर्वेक्षणाच्या कामात तैनात केले आहे.

जे शिक्षक सर्वेक्षणाचे काम करण्यास तयार नाही, अशा शिक्षकांना तहसीलदारांकडून कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आल्या आहे. यामुळे नोकरीच्या भीतीपोटी अनेक शिक्षक जीव धोक्यात घालून सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. रामदास काकडे यांची ड्युटी मागील दीड महिन्यापासून कोविड सर्वेक्षणाच्या कामासाठी लावण्यात आली होती. त्यांना कुठल्याही प्रकारचे सुरक्षा साधने पुरवली गेली नाहीत. अशा परिस्थितीत दिलेल्या कार्यस्थळी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम त्यांनी केले. 

यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. १२ सप्टेंबरपासून  ते लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. १६ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शासनाच्या यादीत कोरोना योद्धा म्हणूनही शिक्षकांचा समावेश नाही. तसेच ५० लाखाच्या विम्यासंदर्भातही शासनाकडून स्पष्टता नाही. अशा बिकट परिस्थितीत २० जुलैपासून नागपूर जिल्ह्यात कोविड १९ सर्वेक्षणाच्या कामात मोठ्या प्रमाणात शिक्षक व्यस्त आहे. 

रामदास काकडेसुद्धा या सर्वेक्षणात सहभागी असताना गेल्या आठ दिवसांत त्यांची प्रकृती बरी नव्हती. यासंदर्भात हिंगणा तहसील यंत्रणेला कळविले होते, मात्र काम करावेच लागेल, असे फर्मान देण्यात आले. यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. कोरोना सर्वेक्षणाचा काकडे नागपूर जिल्ह्यातील पहिला बळी ठरले आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने काकडे कुटुंबीयांना कोविड योध्दा अंतर्गत ५० लाखांची मदत करावी व नागपूर जिल्ह्यातील कोवीड  सर्वेक्षणाच्या कामातून शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करावे, अशी मागणी आता शिक्षकांमध्ये जोर धरत आहे. 

शिक्षकांकडून बळजबरी काम 
कोविड सर्वेक्षणाच्या कामात शिक्षकांची नियुक्ती करू नये, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी खजांजी यांना देण्यात आले होते. शिक्षण उपसंचालकांनी सर्वेक्षणाच्या कामात शिक्षकांना लावू नये, असे आदेश दिले आहेत. तरीही जिल्हा व  तालुका प्रशासनाकडून शिक्षकांकडून बळजबरी काम करून घेतले जात आहे. यामुळे शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर  कारवाई करावी, अशी मागणी संघटनेकडून केली जाणार आहे.
अनिल गोतमारे, जिल्हा अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर.         (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख