fifty six thousand so far the mayor said if private hospitals are not listening, cancel the license | Sarkarnama

अब तक ५६ हजार; महापौर म्हणाले, खासगी रुग्णालये ऐकत नसतील तर परवाना रद्द करा !

अतुल मेहेरे
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

समितीद्वारे शहरातील खाजगी रुग्णालयांमधून ज्या रुग्णांची सुट्टी होणार आहे, अशा सर्व रुग्णांचे अंतिम बिल मागवून त्याची तपासणी केली जाणार आहे. मनपाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा अधिक बिल काढणा-या रुग्णालयांवर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

नागपूर : कोरोनाचा उद्रेक दिवसागणिक वाढत आहे. शहराच्या हॉप्सिटल्समधील बेड्स अपुरे पडत असल्यामुळे कोरोनाचे गांभीर्य काय आहे, हे आता लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. कोरोना रुग्णसंख्येने ५६ हजाराचा आकडा गाठला आहे. आता शहरातील बेड्सची संख्या वाढवणे अति आवश्‍यक झाले आहे. ६१ खासगी रुग्णालयांना कोविड उपचाराची परवानगी देण्यात आली आहे. शहरातील सर्व नोंदणीकृत ६३७ हॉस्पिटल्सनी पाच बेड कोविड रुग्णांसाठी द्यावे, तेही शक्य नसल्यास शासकीय रुग्णालयांना मनुष्यबळ पुरवावे आणि हेसुद्धा कुणी करत नसेल, तर त्या हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा, अशा सूचना महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयांपाठोपाठ शहरातील ६१ खाजगी रुग्णालयांना कोविड उपचाराची परवानगी देण्यात आली आहे. मात्र शहरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याची समस्या उद्भवत आहे. परिणामी ज्यांना जास्त गरज आहे, त्या रुग्णांना उपचारासाठी भटकंती करावी लागते. आजची शहरातील स्थिती लक्षात घेता बेड्सची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांत कोविडचे उपचार व्हावे, यासाठी शहरातील नोंदणीकृत सर्वच खाजगी रुग्णालयांना कोविड उपचार सुरू करण्यासंदर्भात नोटीस देण्यात यावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. 

खाजगी रुग्णालयासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी काल विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात झालेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चिलकर, टाटा ट्रस्टचे टिकेश बिसेन, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेच्या अध्यक्ष डॉ.अर्चना कोठारी, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ.प्रमोद गिरी, उपाध्यक्ष डॉ. मुक्केवार, कन्व्हेनर डॉ. अनूप मरार आदी उपस्थित होते. 

यावेळी महापौर म्हणाले, आज शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ४५ हजारांवर पोहोचली आहे. मागील पाच महिन्यात जेवढी रुग्णसंख्या होती, त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या या एक महिन्यात वाढली आहे. सुरुवातीच्या तुलनेत रुग्णालयात भरती करण्यात येणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरात कोविड रुुग्णांसाठी बेड्स वाढविणे अत्यावश्यक आहे. यामध्ये खाजगी रुग्णालयांची महत्त्वाची भूमिका आहे. आजघडीला नागपूर शहरात ६३७ नोंदणीकृत खाजगी रुग्णालय आहेत. या प्रत्येक रुग्णालयात किमान पाच बेड कोविडसाठीाखीव केल्यास नागरिकांना मोठी सुविधा होणार आहे. जी रुग्णालये त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कोविड बेड्स देण्यास असक्षम आहेत, त्यांनी मनपाला त्यांच्याकडील वैद्यकीय मनुष्यबळ पुरवावे. 

आज मनपाकडे २०० बेड्स तयार आहेत, मात्र वैद्यकीय मनुष्यबळाअभावी तेथे सेवा देणे शक्य नाही. खाजगी रुग्णालयांनी कर्तव्य भावनेतून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कोव्हिड बेड्स उपलब्ध केले किंवा ते शक्य नसल्यास वैद्यकीय मनुष्यबळाचे सहकार्य केल्यास मनपासह इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आणखी ३०० आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील १०० बेड्स नागरिकांसाठी उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे प्रत्येक खाजगी रुग्णालय प्रशासनाने जबाबदारीची जाणीव ठेवून मनपाला सहकार्य करावे. मनपाच्या नोटीसकडे दुर्लक्ष करून कोणतीही कार्यवाही न केल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापौर संदीप जोशी यांनी दिला. 

खाजगी रुग्णालयाचे बिल तपासणीसाठी 'प्री ऑडिट कमिटी'
कोविड पॉझिटिव्ह रुग्णांकडून खाजगी रुग्णालयांमार्फत लाखो रुपये बिल वसूल करण्यात येत असल्याच्या प्रकारावर आळा घालण्यासाठी राज्य शासनाने दखल घेतली आहे. खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणाऱ्या बिलाची तपासणी करण्यासाठी राज्य शासनाने 'प्री ऑडिट कमिटी' गठीत केली आहे. यासंबंधी राज्य मुख्य सचिवांद्वारे मनपाला पत्र देण्यात आले आहे.  
 
त्यानुसार मनपामध्येही समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी यावेळी दिली. या समितीद्वारे शहरातील खाजगी रुग्णालयांमधून ज्या रुग्णांची सुट्टी होणार आहे, अशा सर्व रुग्णांचे अंतिम बिल मागवून त्याची तपासणी केली जाणार आहे. मनपाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा अधिक बिल काढणा-या रुग्णालयांवर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी सांगितल

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख