नागपूर शहरात १५ ते २१ मार्च लॉकडाऊन, अत्यावश्‍यक सेवा राहणार सुरू… - from fifteen to twenty one march there will be lock down in nagpur city | Politics Marathi News - Sarkarnama

नागपूर शहरात १५ ते २१ मार्च लॉकडाऊन, अत्यावश्‍यक सेवा राहणार सुरू…

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 मार्च 2021

गृहविलगीकरणात पाठवलेले लोक आपल्या घरात न राहता फिरताना आढळले तर त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. ज्यांच्या घरी राहण्याची सोय नाही, त्यांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल.

नागपूर : गेल्या दोन आठवड्यांपासून शनिवार आणि रविवारी शहरात लॉकडाऊन करण्यात आले होते. पण त्याला लोकांनी पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. परिणामी शहरात कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वाढली. त्यामुळे आता १५ ते २१ मार्चपर्यंत पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

या लॉकडाऊनदरम्यान शहरातील खासगी कार्यालये बंद राहणार आहेत. सरकारी कार्यालयांत २५ टक्के कर्मचारी उपस्थित राहतील. कारण अनेक कार्यालयांमध्ये मार्च एन्डींगची कामे सुरू आहेत. त्यामुळे ही कार्यालये पूर्णतः बंद करता येणार नाहीत. माध्यम प्रतिनिधींना ओळखपत्र बाळगून शहरात वावर करता येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात दारू विक्रीची दुकाने पूर्णतः बंद राहतील. पण दारूची ऑनलाइन विक्री सुरू राहणार आहे. या काळात लसीकरण सुरू राहणार आहे. लसीकरणासाठी १३१ सेंटर शहर आणि जिल्ह्यात आहेत. या काळात २ लाख लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही डॉ. राऊत यांना स्पष्ट केले. 

नागपूर शहर आणि जिल्ह्यातील खासदार, आमदार, नगसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सर्व लोकप्रतिनिधींनी लसीकरणासाठी योगदान द्यावे. लसीकरणासाठी लोकांना जाण्यायेण्यासाठी व्यवस्था करावी. जेणेकरून लोक केवळ लसीकरण केंद्रावर येतील आणि तेथूनच घरी परत जातील आणि शहरात इतरत्र फिरू शकणार नाहीत. भाजीपाला, किराणा दुकाने, डोळ्यांचे दवाखाने, चष्म्यांची दुकाने, मटण, मासे, चिकन, अंडी विक्रीची दुकाने सुरू राहतील. विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी वायुवेग पथक निर्माण करण्यात आले आहेत. क्वारंटाईन सेंटर आमदार निवासात पुन्हा सुरू केले जाणार आहे. तेथे जे डॉक्टर सेवा देतील, त्यांच्यासाठी वनामतीमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. 

लक्ष्मीनगरसह शहरातील काही भाग हॉटस्पॉट ठरले आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर पूर्णतः बंदी राहील. विनामास्क फिरणाऱ्यांवरही कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. आम्ही शनिवार रविवार लॉकडाऊन करून रुग्णसंख्या कमी करण्याचे प्रयत्न केले होते. पण लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही आणि रुग्णसंख्या सातत्याने वाढत गेली. त्यामुळे कठोरपणे १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. या दिवसांत रुग्णांची संख्या कमी झाली, तर लॉकडाऊन उठवू. नाही तर पुढेही वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल. 

गृहविलगीकरणात पाठवलेले लोक आपल्या घरात न राहता फिरताना आढळले तर त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. ज्यांच्या घरी राहण्याची सोय नाही, त्यांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. प्रत्येक घरी भाजीपाला, किराणा, दूध दररोज लागते. या गरजांची पूर्तता करण्यात येईल. पण लोकांना मुक्तपणे फिरण्यावर पूर्णपणे निर्बंध राहतील. पोलिस आणि मनपाला तशा सूचना दिल्या आहेत. येत्या शनिवारी आणि रविवारी बंदच राहणार आहे. त्यानंतर १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन राहणार असल्याचे पालकमंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख