आर्किटेक्ट निमगडे हत्याकांडात कुख्यात १५ गुन्हेगार, सफेलकरने घेतली होती ५ कोटीची सुपारी  - fifteen notorious criminals in architect nimgades murder safelkar had taken betel of five crore | Politics Marathi News - Sarkarnama

आर्किटेक्ट निमगडे हत्याकांडात कुख्यात १५ गुन्हेगार, सफेलकरने घेतली होती ५ कोटीची सुपारी 

अनिल कांबळे
गुरुवार, 18 मार्च 2021

नब्बू व त्याचे साथीदार प्रत्येक चौकात दोन महिन्यांपासून एकनाथ निमगडे यांच्यावर नजर ठेवून होते. नब्बूने निमगडे यांचे फोटो प्रत्येकाला दाखवले होते. ६ सप्टेंबर २०१६ च्या सकाळी निमगडे नेहमीप्रमाणे गांधीबाग उद्यानातून फिरून घरी परत येत असताना डागा रुग्णालयाच्या पाठीमागील लाल इमली गल्लीत राजा, परवेज व बाबा यांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता.

नागपूर : विमानतळाजवळील १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या साडेपाच एकर जमिनीसाठी राज्यातील बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांची हत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. या हत्याकांडाचा उलगडा करण्यात नागपूर गुन्हे शाखेला यश आले. श्रीराम सेनेचा अध्यक्ष रणजीत सफेलकर याने पाच कोटींची सुपारी घेऊन निमगडे हत्याकांड घडवून आणले. यात एकूण कुख्यात १५ आरोपींचा समावेश आहे. सध्या मुख्य आरोपी सफेलकर हा फरार आहे. 

सफेलकरला कुणी सुपारी दिली होती, हे अद्याप उघड झाले नसले तरी त्याला अटक होताच ते माहिती होईल, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रपरिषदेत सांगितले. ६ सप्टेंबर २०१६ मध्ये लाल ईमली मार्गावर दुचाकीने ट्रिपल सीट आलेल्या हल्लेखोरांनी एकनाथ निमगडे यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे होता. परंतु दोन वर्षांपर्यंत आरोपी न सापडल्यामुळे हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. यादरम्यान पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या १० वर्षांतील ‘अनडिटेक्ट मर्डर’ फाईल्स उघडल्या होत्या. गुन्हे शाखेने निमगडे हत्याकांडातील आरोपींचा शोध घेणे सुरू केले. यामध्ये गुन्हे शाखेला छिंदवाडा जेलमधील राजा नावाच्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सुगावा मिळाला होता. तो धागा धरून गुन्हे शाखेने निमगडे हत्याकांडाचा छडा लावला. सीबीआय लवकरच अटकेची प्रक्रिया करणार आहे. पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी आणि पोलिस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने उपस्थित होते. 

महिनाभर केली होती रेकी 
एकनाथ निमगडे यांचा खून करण्यासाठी रणजीत सफेलकरने एका ‘शेठ’कडून ५ कोटींची सुपारी घेतली होती. त्याने शरद ऊर्फ कालू हाटे, नवाब ऊर्फ नब्बू छोटोसाब अशरफी, शाहबाज, राजा ऊर्फ पीओपी, बाबा, परवेज, फिरोज, मुश्‍ताक ऊर्फ मुशू छोटेसाब अशरफी आणि अफसर या कुख्यात गुंडांच्या टोळीची निवड केली. ॲडव्हान्स म्हणून २० लाख रुपये देण्यात आले. टोळीने महिनाभर रेकी केली. त्यानंतर एक कोटी रुपये टोळीला देण्यात आले. 

हेही वाचा : कुत्रा मेल्यानंतर शोक पण २५० शेतकऱ्यांच्या मृत्यूवर बोलत नाहीत! राज्यपालांची मोदींवर टीका

१०० कोटींच्या भूखंडामुळे हत्याकांड 
आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांची वर्धा मार्गावर विमानतळाजवळ जवळपास १०० कोटींपेक्षा जास्त किमतीची साडेपाच एकर जागा आहे. या जागेवरून हिंदुस्थान ट्रॅव्हल्सचे मालक अन्नू सिद्दीकी, आतीक सिद्दीकी, पायोनिअर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे संचालक अनिल नायर आणि ग्रीन लॅब्रेज नावाच्या कंपनीचे मालक गुप्ता नावाच्या व्यक्तीशी त्यांचा वाद सुरू होता. त्यासंदर्भात दिवाणी न्यायालयात खटलाही सुरू होता. त्यामुळे याच जमिनीच्या वादातून रणजीत सफेलकर याला सुपारी देण्यात आली असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र, रणजीत सफेलकरच्या अटकेनंतर कारण स्पष्ट होईल, असेही अमितेश कुमार यांनी सांगितले. 

तिघांनीही केली फायरिंग
नब्बू व त्याचे साथीदार प्रत्येक चौकात दोन महिन्यांपासून एकनाथ निमगडे यांच्यावर नजर ठेवून होते. नब्बूने निमगडे यांचे फोटो प्रत्येकाला दाखवले होते. ६ सप्टेंबर २०१६ च्या सकाळी निमगडे नेहमीप्रमाणे गांधीबाग उद्यानातून फिरून घरी परत येत असताना डागा रुग्णालयाच्या पाठीमागील लाल इमली गल्लीत राजा, परवेज व बाबा यांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. यात निमगडे यांना पाच गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. 

गुन्हे शाखेला पाच लाखांचे बक्षीस 
निमगडे हत्याकांडाचा पाठपुरावा करण्यासाठी सीबीआयचे पथक बुधवारी नागपुरात आले. या प्रकरणात सबळ पुरावे गोळा करण्यात गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड परिश्रम घेतले. पुराव्यामुळेच आरोपी स्पष्ट झाले. सीबीआयने डीसीपी राजमाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख