वामनराव चटपांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पेटवले 'पांढरे सोने'

कापसाचे 28 फेब्रुवारी 2020 पासूनचे थकलेले चुकारे तातडीने करण्यात यावे. सिसीआयच्या केंद्रावर गाड्यांचे मोजण्याचे काम सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत करावे. शेतकऱ्यांवरील थकीत कर्ज व वीजबिल तातडीने संपविण्यात यावे आदी मागण्या यावेळी अँड. चटप यांनी केल्या.
Wamanrao Chatap
Wamanrao Chatap

राजुरा (जि. चंद्रपूर) : कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या प्रतिकात्मक कापूस पेटवा आंदोलनाला राजुरा तालुक्‍यात जोरदार प्रतिसाद मिळाला. गावागावांतील शेतक-यांनी पाच-पाचच्या गटात एकत्र येऊन विदर्भात पांढरे सोने म्हणून आेळखला जाणारा कापूस पेटवून निषेध केला आणि सरकार विरोधी घोषणा दिल्या. 

शेतकरी संघटनेचे नेते, माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी राजुरा येथील आपल्या घरासमोर पाच प्रमुख कार्यकर्त्यांसोबत मूठभर कापूस पेटवून कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध केला. 

कापसाला सरकार आधारभूत भाव देऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. शासनाने तातडीने महाराष्ट्रभर सिसीआयची कापूस खरेदी केंद्रे तत्काळ वाढवावी. गाड्यांच्या संख्येचे बंधन ठेवण्यात येऊ नये. सध्या सरकार एफएक्‍यू कापूसच पाच हजार 550 रुपये दराने खरेदी करत आहे. परंतु शेतकऱ्यांकडे वीस टक्के कापूस फरतड आहे. त्याला ग्रेड नाही. त्या कापसाला आखूड धाग्याच्या कापसासारखा चार हजार 755 रुपये भाव द्यावा. कापसाचे 28 फेब्रुवारी 2020 पासूनचे थकलेले चुकारे तातडीने करण्यात यावे. सिसीआयच्या केंद्रावर गाड्यांचे मोजण्याचे काम सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत करावे. शेतकऱ्यांवरील थकीत कर्ज व वीजबिल तातडीने संपविण्यात यावे आदी मागण्या यावेळी अँड. चटप यांनी केल्या. 

राजुरा तालुक्‍यात गोवरी, रामपूर, देवाडा, विरुर स्टेशन, लक्कडकोट, आर्वी, अहेरी, वरुर, पाचगाव, भुरकुंडा खुर्द, भेदोडा, पांढरपौनी, हरदोना, वरोडा, साखरी, कढोली, मार्डा यांसह शंभरावर गावांत शेतक-यांनी प्रतिकात्मक मुठभर कापूस पेटवून आंदोलन केले.

या आंदोलनात हरिदास बोरकुटे, कवडू पोटे, मारोतराव लोहे, भास्कर जुनघरी, रामदास जिवतोडे, महादेव थेरे, दत्ता हिंगाणे, मोरेश्वर शेरकी, परशुराम ईद्दे, संजय करमनकर, किशोरभाई चौधरी, सिंधूताई लांडे, रामदास कोहपरे, दिलीप देठे, पुंजाराम बरडे, रामदास कोहपरे,बंडू डोंगे, रवींद्र बोबडे, भिवसन गायकवाड, दत्तू गिरसावळे, आनंद वैरागडे, सतैय्या रामगीरवार, ताज बाबा, मनोज मून, भिमराव बंडी यांच्यासह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. यावेळी प्रभाकर ढवस, पी.यु. बोडे, कपिल ईदे, मधुकर चिंचोलकर, निखिल बोंडे यांची उपस्थिती होती. राजुरा तालुका कॉंग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष ईशाद शेख यांनी आंदोलनादरम्यान शेतकरी संघटनेत प्रवेश केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com