हाॅस्पिटलमधून घरी येताच फडणविसांचे मुख्यमंत्र्यांना लगेच पत्र! - fadnavis writes letter to cm again demandign help for farmers before diwali | Politics Marathi News - Sarkarnama

हाॅस्पिटलमधून घरी येताच फडणविसांचे मुख्यमंत्र्यांना लगेच पत्र!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

राज्य सरकारने तातडीने विदर्भातील प्रशासनाला निर्देश देऊन, दिवाळी ७ दिवसांवर आली असताना तातडीने मदत वितरित करावी. ही कारवाई त्वरेने पूर्ण न केल्यास विदर्भातील शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात जाईल. अन्य अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. 

मुंबई : अतिवृष्टी-बोंडअळीमुळे कापूस-सोयाबीनचे प्रचंड नुकसान झालेले असतानासुद्धा विदर्भातील शेतकऱ्यांना कुठलीही मदत नाही. शेतमाल खरेदीसुद्धा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे अन्य अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

फडणवीस हे कालच कोरोनावरील उपचार पूर्ण करून घरी परतले. त्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या पत्रांना मुख्यमंत्री ठाकरे उत्तर देत नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यालाही मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता पुन्हा फडणविसांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल लिहिले आहे. 

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या ताजा पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, बोंडअळी, बोंडसडीमुळे यंदा विदर्भात कापसाचे मोठे नुकसान झालेले आहे. आताच्या अनुमानानुसार ५० टक्क्यांच्या वर हे नुकसान असून, ते आणखी वाढत जाणार आहे. बोंडअळीने कापूस नष्ट झाला. बोंडसडीत वरून बोंड चांगले दिसत असले तरी ते फोडताच कापूस सडलेला असतो. यंदा बोंडसडीचा प्रकार सर्वत्र आढळून येतो आहे. साधारणत: एकरी ६ क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना अनेक ठिकाणी एकरी १ क्विंटल आणि फार कमी ठिकाणी २ क्विंटलपर्यंत उत्पादन होताना दिसून येत आहे. 

अतिवृष्टीने सोयाबीनचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनचे नुकसान जवळजवळ ८० टक्क्यांच्या आसपास आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात ही स्थिती आहे. इतकी गंभीर स्थिती असतानाही कुठेही सरकारच्यावतीने प्रशासनाला कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. स्थानिक प्रशासन पंचनामे करीत असले तरी त्याचा कोणता फायदा होईल, अशी स्थिती जाचक अटींमुळे नाही. अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात जो शासन आदेश काढण्यात आला, त्यात विविध निकष ठेवल्याने विदर्भातील बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. 

दुसरीकडे शेतमालाची खरेदी अजून प्रारंभ झालेली नाही. ओलसर कापसाला खाजगी व्यापारी भाव देत नाही, त्यामुळे शेतकर्‍याची पिळवणूक होते आहे. सोयाबीन सुद्धा ओला असल्याने ३००० रूपयांपेक्षा कमीच भाव मिळत आहे. त्यामुळे खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी भरडला जातो आहे. सुमारे ८ लाख हेक्टरहून अधिक नुकसान असताना प्रत्यक्षात शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही, अशी स्थिती आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत बाजार समित्यांमध्ये सुद्धा ५० टक्केच शेतमालाची आवक होत असल्याची स्थिती असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, हे स्पष्टच आहे. 

राज्य सरकारने तातडीने विदर्भातील प्रशासनाला निर्देश देऊन, दिवाळी ७ दिवसांवर आली असताना तातडीने मदत वितरित करावी. ही कारवाई त्वरेने पूर्ण न केल्यास विदर्भातील शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात जाईल. अन्य अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.         (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख