पटोलेंनी दिलेली नावे वगळली : प्रदेश महासचिव वारजुकर, दत्तात्रेय यांना डच्चू ?

प्रदेश कार्यकारिणीतील समावेशावरून राज्यात आणि जिल्ह्यात कॉंग्रेस अंतर्गत चांगलेच वादंग माजण्याची शक्यता आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष पटोले नव्या दम्याच्या चेहऱ्यांना संधी देण्यास इच्छुक होते. त्यांना डावलून काही नावे घुसविण्यात आली.
पटोलेंनी दिलेली नावे वगळली : प्रदेश महासचिव वारजुकर, दत्तात्रेय यांना डच्चू ?
Sarkarnama

चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या Maharashtra State Congress नव्या १९० सदस्यांच्या जम्बो कार्यकारिणीवरून पक्षांतर्गत वादळ उठले आहे. या कार्यकारिणीत चंद्रपूर जिल्ह्यातील चार जणांचा समावेश झाला आहे. माजी आमदार अविनाश वारजुकर Former MLA Avinash Warjukar आणि विनोद दत्तात्रेय Vinod Dattatrey यांच्याकडे प्रदेश कॉंग्रेसच्या महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षांतर्गत विरोधकांनी या दोघांच्या तक्रारी पक्षनेतृत्वाकडे केल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही नावांवर फेरविचार केला जाईल, असा दावा सूत्रांनी केला. कार्यकारिणीत नवे चेहरे सामावून घेतले जाणार आहेत, अशी माहिती प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीसुद्धा  ‘सरकारनामा’शी बोलताना दिली. त्यामुळे सूत्रांच्या दाव्याला बळ मिळते. 
 
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या नव्या कार्यकारिणीत राज्यभरातील १९० जणांचा स्थान दिले आहे. परंतु प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली नावे वगळण्यात आली. पटोले यांना विश्वासात न घेता दिल्लीतून कार्यकारिणीत परस्पर काही नावे घुसविण्यात आली. कार्यकारिणीत स्थान देण्यासाठी पैसे घेतल्याचासुद्धा आरोप झाला. पटोले आणि राज्यातील कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी सोनिया आणि राहुल गांधीकडे यांच्याकडे यासंदर्भात तक्रारी केल्या. पटोले यांना दिल्लीत बोलावून घेतले. त्यांनी  कार्यकारिणीतील काही नावांवरून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या कार्यकारिणीला दिल्लीतून अद्याप हिरवी झेंडी मिळाली नाही, अशीही माहिती आहे. नव्या जम्बो कार्यकारिणीतील काही नावे वगळण्यात येणार आहे, अशी चर्चा आता कॉंग्रेसच्या वर्तुळात सुरू आहे. 

दरम्यान या घटनाक्रमामुळे प्रदेश कार्यकारिणीत समावेश झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्यांचा जीव टांगणीला लागला आहे. चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजकुर यांच्या विरोधात  एका 'नाजुक' प्रकरणात चार वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यात गुन्हा दाखल झाला  होता. या गुन्ह्याचा आधार घेत दिल्लीपर्यंत त्यांच्या विरोधात तक्रारींचा पाऊस पाडण्यात आला आहे. माध्यमांची कात्रण पाठविण्यात आली. याच कारणांमुळे सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या ऐवजी त्यांच्या भावाला उमेदवारी देण्यात आली. अशा व्यक्तीला प्रदेश कार्यकारिणीत महासचिव पदावर नियुक्ती देऊन पक्ष  चुकीचा संदेश देत आहे. त्यामुळे वारजुकर यांच्या नावावर फेरविचार होऊ शकतो, असा त्यांच्या विरोधकांचा दावा आहे. 

कॉंग्रेसमधील  चंद्रपूर जिल्ह्यातील 'वन मॅन आर्मी' अशी ओळख असलेले विनोद दत्तात्रेय यांच्याही नावाला पक्षातून प्रचंड विरोध आहे. याआधी दत्तात्रेय यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी केली होती. तेव्हा त्यांच्या पदरी निराशाच आली. आता त्यांनी महासचिवपद मिळविले. तेसुद्धा हिसकावून घेण्याची तयारी त्यांच्या विरोधकांनी केली आहे. पक्षाचे संघटन बळकट करणारा आणि लोकसंग्रह असलेल्या व्यक्तीला पद देण्याऐवजी दत्तात्रेय यांना कोणत्या आधारावर कार्यकारिणीत स्थान देण्यात आले, अशी विचारणा त्यांचे विरोधक करीत आहे. त्यांचीही  तक्रार प्रदेश आणि दिल्लीत करण्यात आल्याची माहिती आहे.

एवढेच नव्हे तर आधी कॉंग्रेस, नंतर राष्ट्रवादी आणि सन २०१९ च्या निवडणुकीत सेनेची उमेदवारी घेणारे संदीप गड्डमवार यांना प्रदेशाच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्याविषयी नाराजीचा सूर आवळण्यात येत आहे. दुसरे नवनियुक्त प्रदेश सचिव शिवा राव यांनी आतापर्यंत पक्षात अनेक महत्वाची पद उपभोगली आहे. आता नव्याने त्यांना प्रदेश सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. राव यांचा पक्षाला आतापर्यंत कोणता लाभ झाला, हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या ऐवजी नव्या दम्याच्या चेहऱ्याला संधी द्यावी, असा सूर पक्षात आहे. 

परिणामी आगामी काळात प्रदेश कार्यकारिणीतील समावेशावरून राज्यात आणि जिल्ह्यात कॉंग्रेस अंतर्गत चांगलेच वादंग माजण्याची शक्यता आहे.  स्वतः प्रदेशाध्यक्ष पटोले नव्या दम्याच्या चेहऱ्यांना संधी देण्यास इच्छुक होते. त्यांना डावलून काही नावे घुसविण्यात आली. त्यामुळे कार्यकारिणीत फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. कार्यकारिणीत नवे चेहरे सामावून घेतले जाणार आहेत, अशी माहिती प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिली. जुन्यांना वगळण्याच्या प्रश्न आणि तक्रारींवर मात्र त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in