‘वीज बिलांची पठाणी वसुली करीत ऊर्जामंत्र्यांनी चमकवले आपले घर, कार्यालय’ - energy minister shines his house and office by recovering electricity bills | Politics Marathi News - Sarkarnama

‘वीज बिलांची पठाणी वसुली करीत ऊर्जामंत्र्यांनी चमकवले आपले घर, कार्यालय’

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 मार्च 2021

ऊर्जामंत्र्यांनी जेवढी ऊर्जा स्वतःचा थाट दाखवण्यासाठी वापरली आहे, तेवढ्याच ऊर्जेने महाराष्ट्रातील गरीब जनतेची वाढवून पाठवलेली लाइट बिले कमी करून देण्यात दाखवली असती, तर बरे झाले असते. गरीब जनतेला लुटून ऐश चालू आहे.

नागपूर : आमची तिजोरी रिकामी आहे, अशी बोंबाबोंब करणाऱ्या सरकारचे मंत्री मात्र आपल्या ऐशआरामावर पैशांची वारेमाप उधळपट्टी करत आहेत, असे ट्विट भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून केले आहे. सोबत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आलिशान घर आणि कार्यालयाचे फोटोदेखील भाजपने शेअर केले आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीपासूनच सरकारला विरोधकांनी एकावर एक धक्के देणे सुरू केले आहे. आधी पुजा चव्हाण मृत्युप्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागला. त्यातून सावरत नाही तोच सचिन वाझे प्रकरणात दुसरा झटका सरकारला बसला आणि सरकार बॅकफुटवर गेली. या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले. त्यांचे गृहमंत्रिपद काढून घेण्याइतपत चर्चा राज्यभर रंगल्या. ते होत नाही तोच कॉंग्रेसचे नेते ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्‍यता आहे. डॉ. राऊत यांनी खासगी कामासाठी राज्य सरकारच्या चार्टर्ड विमानाचा अनधिकृतपणे वापर केला, अशी तक्रार भाजपचे मीडिया विभागाचे प्रमुख विश्‍वास पाठक यांनी मुंबईतील निर्मल नगर पोलिस ठाण्यात दिली आहे. 

या सर्व एकामागून एक होणाऱ्या हल्ल्यातून सावरायचे कसे आणि काय करायचे, या विचारात सरकारचे मंत्री असतानाच आज भाजपने आपल्या अधिकृत हॅंडलवरून ‘आमची तिजोरी रिकामी म्हणून बोंबाबोंब करणाऱ्या ठाकरे सरकारच्या उधळपट्टीचा एक नमुना... हे घर आणि कार्यालय आहे ऊर्जामंत्री @NitinRaut_INC यांचं. या ऐशआरामात अजून काही कसर बाकी असल्यामुळे गोर-गरीब, शेतकरी आणि सामान्यांची वीज तोडण्याची जोरदार मोहीम राज्यात सगळीकडे सुरू असावी !’ असे ट्विट करीत फोटोदेखील शेअर केले. त्यावर ऊर्जामंत्र्यांनी जेवढी ऊर्जा स्वतःचा थाट दाखवण्यासाठी वापरली आहे, तेवढ्याच ऊर्जेने महाराष्ट्रातील गरीब जनतेची वाढवून पाठवलेली लाइट बिले कमी करून देण्यात दाखवली असती, तर बरे झाले असते… गरीब जनतेला लुटून ऐश चालू आहे.’, ‘सगळेच राजकारणी तळागाळातून येतात, आणि बघतां बघतां मगरमच्छ होतात. बंगले, गाड्या, मुलांची लग्न पंचतारांकित हॉटेलांतच करतात. शेवटी हे तळ्यातला गाळसुद्धा सोडत नाहीत. विकास यालाच म्हणतात भारतात.’, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे चार्टर्ड विमानानंतर घर आणि कार्यालयावर उधळपट्टी करणे ऊर्जामंत्र्यांच्या अंगलट येईल, असे बोलले जात आहे.  

हेही वाचा : नितीन राऊतांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी शक्य, नानांना मिळणार ‘ऊर्जा’?

कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बेताची असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगी न घेता राज्य सरकारचे चार्टर्ड विमान वापरले, असे पाठक यांनी मुंबई पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. एकीकडे कोरोना विषाणूच्या साथीमुळे लॉकडाऊन करावे लागले. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती, नेमके त्याच काळात म्हणजे जुलै महिन्यांत राऊत यांनी आपल्या खासगी कामांसाठी राज्य सरकारच्या चार्टर्ड विमानाचा वापर केला, असा आरोप पाठक यांनी केला आहे. पाठक यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नितीन राऊत यांनी नागपूर, मुंबई, हैदराबाद, दिल्ली, औरंगाबाद, असा प्रवास केला आहे. हा सर्व प्रवास हा सरकारी कामासाठी नसून खासगी कारणासाठी होता. नितीन राऊत हे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी दबाव टाकून सरकारी कंपन्यांना ही बिलं भरायला लावली आहेत, असा आरोप भाजपचे पाठक यांनी तक्रारीत केला आहे. 

मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता राऊत यांनी परस्पर विमानाचा वापर केला. तसेच, सरकारी कंपन्यांना बिले भरायला लावली, त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी पाठक यांनी तक्रार अर्जातून केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर कारवाई करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. अन्यथा आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून न्यायालयीन लढाई लढण्यास तयार आहोत, असा इशारा पाठक यांनी दिला आहे. 

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या स्पेशल हवाई प्रवासाचे बिलं भरण्यासाठी गोरगरीब जनतेकडून सक्तीची वीज बिल वसुली मोहीम राबवली जात आहे. अरे निर्दयी ठाकरे सरकार...सामान्य नागरिकांना  लुबाडताना जनाची नाही मनाची तरी लाज वाटू द्या! जनतेने तुमच्याकडून आता काय अपेक्षा ठेवावी?, शब्दांत भाजपने ट्विट करत राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बिलं भरल्याशिवाय कारभार चालूच शकत नाही, म्हणत एकीकडे वीजकंपनी बिलवसुलीसाठी सर्वसामान्यांवर कनेक्‍शन तोडण्याचा बडगा उगारते. दुसरीकडे ऊर्जामंत्री चार्टर्ड विमानातून फिरतात. ऊर्जामंत्र्यांचं विमान जमिनीवर आणल्याशिवाय भाजप थांबणार नाही, असा इशाराही भाजपकडून देण्यात आला आहे. एकंदरीतच पैशांची उधळपट्टी डॉ. नितीन राउतांची ‘ऊर्जा’ कमी करणार, असे सांगितले जात आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख