वर्धा नदीत एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले, तीन मृतदेह सापडले..

बुडालेल्यांमध्ये भाऊ, बहीण, जावई यांचा समावेश आहे. एक महिला आणि लहान मुलीसह तीन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
वर्धा नदीत एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले, तीन मृतदेह सापडले..
Sarkarnama

नागपूर : अमरावती जिल्ह्याच्या वरूड तालुक्यात Warud tahasil of Amravati District वर्धा नदीत In Wardha River श्री क्षेत्र झुंज नजीक नाव उलटून ११ जण बुडाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यांतील तीन मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. उर्वरित लोकांचा अद्याप शोध लागलेला नाही. ही घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. 

धक्कादायक म्हणजे हे अकराही जण एकाच कुटुंबातील आहेत. इतर ८ जणांचा शोधण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या कुटुंबातील सर्व जण दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी आले होते. दशक्रिया काल आटोपली. गाडेगाव येथील मातरे यांच्याकडे हे सर्वजण आले होते, असे सांगण्यात आले. आज सकाळी हे सर्व जण फिरण्यासाठी निघाले होते. फिरता फिरता नदीच्या दुसऱ्या तीरावर असलेल्या शंकराच्या मंदिरात जाण्याचे त्यांनी ठरवले आणि नावेत सवार झाले. थोड्या दूर गेल्यावर नाव उलटली आणि सर्व जण बुडाले. 

बुडालेल्यांमध्ये भाऊ, बहीण, जावई यांचा समावेश आहे. एक महिला आणि लहान मुलीसह तीन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. पण अद्याप इतर मृतदेहांचा ठावठिकाणा लागलेला नाही. नारायण मातरे (वय ४५, रा. गाडेगाव) वंशिका शिवंकर (वय २, हा. तिवासघाटी) आणि किरण खंडारे (वय २८, रा. मक्खन) यांचे मृतदेह सापडले. तर अश्विनी खंडारे, वृषाली वाघमारे, अतुल वाघमारे, अदिती खंडारे, मोहिनी खंडारे (सर्व राहणार तारासवांगा), निशा मातरे (रा. गडेगाव), पियूष मातरे (रा. गडेगाव) आणि पूनम शिवंकर (रा. तिवासघाटी) या ८ जणांचा शोध लागलेला नाही, असे सांगण्यात आले आहे. 

बेनोडा पोलिस घटनास्थळी तैनात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्यात पूरपरिस्थिती असताना सावध राहण्याचा इशारा प्रशासनातर्फे वारंवार देण्यात येतो. पाऊस सुरू असताना आणि नदीला पूर असताना पाण्यात जाऊ नये, असे फलक लागलेले असतात. पण त्याकडे दुर्लक्ष करून लोक अतिउत्साहात पाण्यात उतरण्याचा हट्ट करतात. असा हट्ट अनेकांच्या जिवावर बेतलेला आहे. पण काही लोक त्यापासून धडा घेत नाहीत. परिणामी अशा दुर्घटना घडतात. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in