कोरोना ईफेक्‍ट : तंबाखू मिळत नसल्याने आली वेडे होण्याची वेळ

वर्षानुवर्षापासून तंबाखू खाणाऱ्यांना एकाएकी तो मिळणे बंद झाल्यास त्यांना नैराश्‍य, आक्रमकपणा, चिडचिड, कामात लक्ष न लागणे, पोटाचा त्रास अशा व्याधी जडतात. तंबाखुअभावी शारीरिक बदलांपेक्षा मानसिक बदल जास्त प्रमाणात होतात. आक्रमकपणा जास्त वाढल्यास असे लोक मनोरुग्ण होऊ शकतात.
Raja Akash on tobacco
Raja Akash on tobacco

मांगलादेवी (जि. यवतमाळ) ः कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉक डाऊन सुरू आहे. जिवनावश्‍यक वस्तुंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय ठप्प आहेत. ग्रामीण भागांत शेतकरी व मजुरांना काबाडकष्ट करावे लागतात. अक्षरशः जिवाचे रान करीत घाम गाळावा लागतो. या ढोर मेहनतीने अंग ठणकते. यापासून सुटका आणि काहीसा विरंगुळा देणारा स्वस्त अन मस्त शौक म्हणजे तंबाखू. साधारणतः 95 टक्के ग्रामीण जनता ही तंबाखूच्या अधिन गेलेली आहे. परंतु तंबाखूबंदी मुळे भावही गगनाला भिडले. उपलब्धता होत नसल्याने अनेकांची वाटचाल वेडे होण्याकडे होत चालली असल्याचे दिसतेय. 

"तंबाखू खाल्ला' की अनेक जण तणावापासून मुक्त झाल्याचा अनुभव घेतात. सर्वसामान्यांचा तंबाखू सध्या मिळेनासा झाल्यामुळे सेवन करणारे अनेक व्यसनाधिन मनोरुग्ण होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. तंबाखू खाणाऱ्याजवळची पुडी संपली की तो तंबाखू बाळगणाऱ्याच्या शोधात निघतो. अक्षरशः दीड-दोन किलोमीटरची पायपीटही करतो. हे ग्रामीण भागातील वास्तव आहे. तंबाखू खाणाऱ्यांमध्ये जात-पात, उच-नीच, गरीब-श्रीमंत अशा कुठलाच भेदभाव नसतो. तंबाखू नाहीच मिळाला तर तंबाखूच्या काड्या चघळून तो आपली तलब भागवतो. अशा एक ना अनेक गोष्टी तंबाखू खाणाऱ्याच्या बाबतीत लोक आजपर्यंत ऐकत होते. प्रत्यक्षात मात्र हे प्रसंग बघायला मिळत नव्हते. तो योग कोरोनाच्या लॉकडाऊन ने आणला. अचानक देशभरात लॉक डाऊन घोषित झाले. सोबतच तंबाखूजन्य पदार्थावर विक्रीस बंदी आली आणि त्यामुळे कधी नुसत्या ऐकिवात असलेल्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. 

तंबाखूवरील बंदीमुळे आज ग्रामीण व शहरी भागात तंबाखूचा लपून चोरून व्यवसाय सुरू आहे. ओळखीचा असल्यास त्याला तो मिळतो. किंमत मात्र कधी ऐकली नसेल एवढी. पाच रुपये किमतीची तंबाखू पुडी आज कुठे पन्नास रुपये तर कुठे सत्तर रुपयांना विकली जात आहे. ग्रामीण जनता ही शेतकरी, शेतमजूर व काबाडकष्ट करणारी. तंबाखूचे व्यसन 95 टक्के लोकांना आहे. तंबाखू-चुना मळताना कुणी दिसला की, आजूबाजूला दोन-चार लोक जमलेच समजा. अशावेळी तंबाखू मळणारा जाम खुश होत असतो आणि आपल्या खिशातील तंबाखू चुन्याची डब्बी समोरच्याला देताना त्याच्या चेहऱ्यावरील दातृत्वाचा आनंद जणू पुरणपोळीचा पाहुणचार करत असल्याचे भाव निर्माण करतो. आणि घेणारा पण त्याला जणू अमृत रसपान मिळाले अशा अविर्भावात तंबाखू मळून खातो. कोरोनामुळे मात्र ही दृष्य हल्ली दिसेनाशी झाली आहेत. 

आज ग्रामीण भागात तंबाखूसाठी जनता वणवण भटकताना दिसते. कारण तंबाखू न मिळाल्यामुळे अनेकांना पोटदुखी, अस्वस्थपणा, शौचास साफ न होणे, झोप न लागणे, काहीतरी चुकल्यासारखे वाटणे, अशक्तपणा जाणवणे, उत्साह न वाटणे, आनंद हिरावून नेल्याचा भास होणे इत्यादी लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे कोणी ओळखीचा अथवा जवळचा दिसला की, "दादा, भाऊ आहे का तंबाखू' अशा हाका ऐकायला मिळतात आणि जवळ जाऊन हळुच तंबाखू मागितला जातो. पण लोकांच्या वाट्याला निराशाच येत आहे. 

तंबाखू मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागात विशेषतः मजुरांमध्ये नैराश्‍य आल्याचे दिसते. अनेकांची क्रयशक्ती कमी झाल्याचे जाणवते. रात्रीची झोप न झाल्याने, शौचास साफ न होणे, भूक न लागणे, डोके दुखणे अशा व्याधी जडत असल्याने अनेक जण तंबाखूच्या शोधात भटकताना दिसतात. बंदीमुळे हीच परिस्थिती कायम राहिल्यास अनेक मानसिक रुग्ण निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. "तिकडे कोरोना संकटाची भीती, तर इकडे तंबाखुची तलब. या दोहोंच्या चक्रात आम्ही अडकलेलो आहोत. काय कराव... डोकं चालत नाही, पोट साफ होत नाही, झोप बी लागत नाही, गयल्यासारख वाटते' अशा प्रतिक्रीया ग्रामीण भागातील लोकांनी दिल्या, मात्र नाव उघड न करण्याच्या अटीवर. 

लॉकडाऊन ही व्यसनमुक्त होण्याची सुवर्णसंधी : प्रा.डॉ. राजा आकाश 
वर्षानुवर्षापासून तंबाखू खाणाऱ्यांना एकाएकी तो मिळणे बंद झाल्यास त्यांना नैराश्‍य, आक्रमकपणा, चिडचिड, कामात लक्ष न लागणे, पोटाचा त्रास अशा व्याधी जडतात. तंबाखुअभावी शारीरिक बदलांपेक्षा मानसिक बदल जास्त प्रमाणात होतात. आक्रमकपणा जास्त वाढल्यास असे लोक मनोरुग्ण होऊ शकतात. तंबाखू मिळणे बंद झाल्यावर त्या व्यक्तिने व्यसन सोडायचे ठरवलं आणि त्याला कुटुंबियांचे पाठबळ मिळाले, तर अशी व्यक्ती व्यसनमुक्त होऊ शकते. जगातलं कुठलंही व्यसन 21 दिवसांत सुटू शकतं, असं मानसशास्त्र सांगतं. दारू, सिगारेट, तंबाखुचे नियमित सेवन करणाऱ्या लोकांनी प्राप्त परीस्थिती स्विकारली आणि व्यसनमुक्त होण्याचा निश्‍चय केला, तर हे शक्‍य आहे. पण लॉकडाऊनच्या या स्थितीतही केवळ 10 टक्के लोकांचीच मानसिकता व्यसन पूर्णपणे सोडण्याची आहे, असे दिसतेय. उर्वरीत लोक हाच विचार करताहेत की, जेव्हा उपलब्ध होईल, तेव्हा मी व्यसन करणारच. अगदी ठरवूच ठेवलं असेल, तर व्यसन सुटणार नाही, असे नागपुरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ प्रा. डॉ. राजा आकाश म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com