डॉ. सुनील देशमुख म्हणाले, भाजपबद्दल मनात कुठलाही कडवटपणा नाही; पण… - dr sunil deshmukh said there is no bitterness in the mind about bjp but | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

डॉ. सुनील देशमुख म्हणाले, भाजपबद्दल मनात कुठलाही कडवटपणा नाही; पण…

सुरेंद्र चापोरकर
गुरुवार, 17 जून 2021

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनं त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी देखील सोपवली होती. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर अमरावती मतदारसंघातून त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांचा पराभव केला.

अमरावती : कॉंग्रेस पक्षातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून नंतर भारतीय जनता पक्षात गेलेले राज्याचे माजी अर्थ राज्यमंत्री, माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी आज स्वगृही परतण्याचा निर्णय जाहीर केला. याबाबत त्यांना विचारले असता, भाजपमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली. भाजपबद्दल मनात कुठलाही कडवटपणा नाही, पण राजकीय जन्मच कॉंग्रेसमध्ये झाल्यामुळे परतीचे वेध लागले होते. त्यामुळे स्वगृही आलो, असे ते म्हणाले. 

डॉ. सुनील देशमुख शनिवारी, १९ जून रोजी कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवशी अधिकृतपणे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच दिवशी मुंबईतील कॉंग्रेसच्या नूतनीकरण झालेल्या टिळक भवनाचेही उद्घाटन आहे. त्याच सोहळ्यात त्यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. डॉ. देशमुख म्हणाले, कॉंग्रेस सोडून जाण्याची तेव्हाही इच्छा नव्हती. पण त्यावेळी राजकीय परिस्थितीने तशी कलाटणी घेतल्यामुळे तसा निर्णय घ्यावा लागला. आता कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढे काय, असा प्रश्‍न विचारला असता, सध्या काहीच ठरविलेले नाही. भविष्यात काय संधी मिळते, ते बघू आणि पक्षश्रेष्ठींचा जो आदेश असेल त्याप्रमाणे कार्य करू, असे त्यांनी सांगितले. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान झालेल्या गुप्त भेटीनंतर डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर काँग्रेस हायकमांडने देशमुख यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला. डॉ. सुनील देशमुख यांच्यासोबत दिग्रस विधानसभा मतदार संघातील माजी आमदार संजय देशमुख हेसुद्धा घरवापसी करणार असल्याचे सूत्र सांगतात. डॉ. सुनील देशमुख हे २००४ साली अमरावती विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थराज्यमंत्री होते. त्याशिवाय, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर २००९ मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या होल्डिंग कंपनीचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेडचे सह-अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचे तिकीट कापून रावसाहेब शेखावत यांना काँग्रेसने उमेदवारी बहाल केली होती. देशमुख यांचे तिकीट कापल्याने नाराज झालेले शहरातील काँग्रेसचे काही पदाधिकारी देशमुख यांच्यासमवेत गेले होते. त्यावेळी प्रतिभाताई राष्ट्रपती होत्या. त्यामुळे देश-विदेशातील प्रसारमाध्यमे आणि राजकीय पुढाऱ्यांचे अमरावती मतदारसंघाकडे लक्ष होते. रावसाहेब शेखावत विरुद्ध डॉ. सुनील देशमुख ही लढत आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय झाली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याचे आव्हान त्या वेळी राष्ट्रपती पुत्रापुढे होते व त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रपती पुत्र रावसाहेब शेखावत जवळपास ५००० मतांनी विजयी झाले होते. 

हेही वाचा : मर्जीतील लोकांना दिले शिवभोजनचे कंत्राट, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार...

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपनं त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी देखील सोपवली होती. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर अमरावती मतदारसंघातून त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांचा पराभव केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा संजय खोडके यांनी मात्र भाजपच्या डॉ. सुनील देशमुख यांचा पराभव केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप डॉ. देशमुखांना सुरुवातीपासूनच पचनी पडली नव्हती. भाजपमध्ये डॉ.अस्वस्थ राहत होते, असेही सांगण्यात येते. पक्षात ते फारसे सक्रिय राहात नव्हते. त्यामुळे त्यांनी परत काँग्रेसकडे जाण्याचे ठरविले व येत्या १९ जून रोजी ते परत घरवापसी करणार आहेत. मात्र डॉ. सुनील देशमुख यांची घरवापसी हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या या घरवापसीमुळे काँग्रेस मध्ये ‘कही खुशी तो कही गम’ असे वातावरण अमरावती शहरात सध्या निर्माण झाले आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख