पालकमंत्र्यांकडून लेखी आश्‍वासनानंतर डॉक्टरांचे आंदोलन मागे 

डॉक्टरांच्या संघटनेला तब्बल 35 संघटनांचा पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता होती. जनतेला सेवा देण्यासाठी पालकमंत्री राठोड यांनी मध्यस्थी केली. डॉक्टर व सर्व संघटनांनी जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.
Sanjay Rathod - doctors
Sanjay Rathod - doctors

यवतमाळ : गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीच्या मागणीसाठी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांची बदली झाल्याशिवाय पुन्हा काम सुरू करणार नाही, असा पवित्रा आंदोलक डॉक्टर्ससह सर्व संघटनांनी घेतला होता. काल संध्याकाळपासून पालकमंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांना आज यश आले आणि लेखी आश्‍वासनानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संप मागे घेतला. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत गेल्या चार दिवसांपासून आरोग्य अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. डॉक्टरांच्या संघटनेला तब्बल 35 संघटनांचा पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता होती. जनतेला सेवा देण्यासाठी पालकमंत्री राठोड यांनी मध्यस्थी केली. डॉक्टर व सर्व संघटनांनी जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी सर्व संघटनांच्या कोर कमिटीची बैठक दुपारी चार वाजता आंदोलनस्थळी झाली. 

या ठिकाणी संघटनांचे जनतेसाठी आंदोलन मागे घेण्यावर एकमत झाले. मात्र, मागण्यांवर लेखी आश्‍वासन द्यावे, असे ठरले. त्यानंतर सर्व संघटना पदाधिकाऱ्यांनी विश्राम भवन येथे पालकमंत्री राठोड यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पालकमंत्री राठोड, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. सर्व अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. मात्र, अपमानास्पद वागणूक यापुढे दिली जाऊ नये, अशी मागणी केली. मागण्यांचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

लेखी आश्‍वासन
-जिल्हाधिकाऱ्यांचे गैरवर्तन यापुढे झाल्यास त्यांच्या बदलीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविणार
-यापुढे मुख्य कार्यकारी अधिकारी आरोग्य विभागातील सर्वस्तरावरील आढावा, अहवाल घेणार
-आंदोलनात सहभागी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी असलेल्यांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही, अहवालाबाबत वेळमर्यादा निश्‍चित करून दिली जाईल. 
-शासकीय महाविद्यालयात 50 खाटा राखीव.
-औषधी दुकान, पॅथॉलॉजी, सिटी स्कॅन सेंटर राखीव ठेवून सर्व खर्च जिल्हास्तरीय कोविड निधीमधून करण्यात यावा.
यांसह 14 मागण्यांवर लेखी आश्‍वासन आंदोलकांनी घेतले. 

(Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com