एका घटनेमुळे मला ‘रॉंग बॉक्स’मध्ये उभे करू नका : वनमंत्री संजय राठोड - do not put me in wrong box because of an accident | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

एका घटनेमुळे मला ‘रॉंग बॉक्स’मध्ये उभे करू नका : वनमंत्री संजय राठोड

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

गेल्या १५ दिवसांपासून मी गायब आहे, असे विविध माध्यमांतून सांगितले जात आहे. मी १५ दिवस नव्हे, तर १० दिवस लोकांसमोर आलो नाही. कारण मिडीयावर लोकांचे माझ्यावर असलेले प्रेम मी पाहत होतो. इतके घाणेरडे आरोप माझ्यावर झाल्यानंतर माझे वडिल, पत्नी आणि मुलांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर होती.

नागपूर : गोरबंजारा समाजातील मुलगी पूजा चव्हाण हीचा पुणे शहरातील वानवाडी परिसरात मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे दुःख मला, माझ्या कुटुंबीयांना आणि संपूर्ण बंजारा समाजाला आहे. पण या घटनेनंतर माझ्यावर विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आले. अतिशय घाणेरडं राजकारण केले जात आहे. ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. या एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

बिड जिल्ह्याच्या परळी येथील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हीचा पुणे येथे वानवाडी परिसरात ८ फेब्रुवारीला मृत्यू झाला. त्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांकडून विविध आरोप करण्यात आले. आज १५ दिवसांनंतर ते वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे पत्नी आणि साळा सचिन नाईक यांच्यासह दर्शनासाठी गेले. तेथे त्यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. महंत सुनील महाराज यांनी त्यांच्यासाठी तेथे हवन केला. तेथे मंत्री राठोड माध्यमांशी बोलणार की नाही, याबद्दलही साशंकता होत. पण ते माध्यमांसमोर आले आणि एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असे माध्यमांना सांगितले. 

राठोड म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतर प्रकरणातील सत्य काय ते समोर येणारच आहे. विविध माध्यमांतून माझी, माझ्या परिवाराची आणि समाजाजी बदनामी केली जात आहे. राज्यात त्याबद्दल घाणेरडं राजकारण केलं जात आहे, हे दुर्देवी आहे. मी भटक्या जमातीतील व्यक्ती समाजकारणातून राजकारणात आलो. गेले ३० वर्ष मी समाजासाठी जनतेसाठी काम करतो आहे. ओबीसी समाजाचं नेतृत्व करत आहो. पण या एका घटनेवरून विविध आरोप करून मला राजकीय आयुष्यातून उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

गेल्या १५ दिवसांपासून मी गायब आहे, असे विविध माध्यमांतून सांगितले जात आहे. मी १५ दिवस नव्हे, तर १० दिवस लोकांसमोर आलो नाही. कारण मिडीयावर लोकांचे माझ्यावर असलेले प्रेम मी पाहत होतो. इतके घाणेरडे आरोप माझ्यावर झाल्यानंतर माझे वडिल, पत्नी आणि मुलांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर होती. त्यांना सांभाळणं मला खुप अवघड गेले. त्यामुळे त्यांना सांभाळण्यात माझा जास्त वेळ गेला. या घटनेतून सावरल्यानंतर मी आज समोर आलो असल्याचेही मंत्री राठोड म्हणाले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख