पालकमंत्र्यांमुळेच जिल्हाधिकारी झाले मस्तवाल : देवानंद पवार - district collector is misbehaving only because of the guardian minister said devanand pawar | Politics Marathi News - Sarkarnama

पालकमंत्र्यांमुळेच जिल्हाधिकारी झाले मस्तवाल : देवानंद पवार

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

पालकमंत्री अशावेळी स्तब्ध बसून आहेत, हे जिल्ह्याच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडत चालली आहे. उद्या काही गंभीर प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवरच निश्‍चित करावी.

नागपूर : यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या विरोधात रान पेटले असताना ते येवढे स्तब्ध कसे काय बसू शकतात? जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. मृत्यूदर वाढत आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्र्यांनी वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये मध्यस्थी करून तोडगा काढणे अपेक्षित आहे. पण पालकमंत्र्यांचाच पाठिंबा असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमध्ये येवढा मस्तवालपणा आला असल्याचा आरोप किसान कॉंग्रेसचे विदर्भ अध्यक्ष देवानंद पवार यांनी केला. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या मस्तवालपणामुळे जी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे उद्या जर कोरोना रुग्णांचे मृत्यू वाढले, तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी आम्ही करू, असेही पवार म्हणाले. कुणीही डॉक्टर्सना सांगितले नाही की, आंदोलन करा. आपली मागणी घेऊन ते जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले आणि तेथे जो प्रकार घडला, त्यानंतर वैद्यकीय अधिकारी संतापले. अचानक जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात येवढा रोष का उफाळून आला. कारण त्यांनी अशासकीय आणि असंवैधानिक भाषेचा वापर केला. तसे ते नेहमीच करतात. माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच असा जिल्हाधिकारी मिळाला. यापूर्वी असा प्रकार कधीच झाला नाही, असेही ते म्हणाले. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात केवळ वैद्यकीय अधिकारीच नव्हे तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, आयएमए, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सर्वच संघटना एकवटल्या आहेत. त्यांच्या विरोधात येवढे रान पेटले असताना आता तरी त्यांनी आत्मपरीक्षण करावे आणि डॉक्टर मंडळींची माफी मागावी. नाही तर त्यांचे आंदोलन आणखी चिघळत जाईल आणि मोठा भडका व्हायला वेळ लागणार नाही. अधिकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांची सामान्य जनतेसोबतही चांगली वागणूक नाही. त्यांच्या समर्थनार्थ ज्यांनी कुणी पोस्टर लावले, त्यांना उघडपणे समोर यायला कुणाची भीती आहे? समर्थन करायचेच असेल तर त्यांनी खुलेआम समोर यावे.

श्री पवार म्हणाले की, आपण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना यवतमाळात घडलेला प्रकार सांगितला आहे. जरी यवतमाळ त्यांचा जिल्हा नाही, पण योग्य वेळी ते या प्रकारावर बोलतील, अशी अपेक्षा आहे. पण पालकमंत्री अशावेळी स्तब्ध बसून आहेत, हे जिल्ह्याच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडत चालली आहे. उद्या काही गंभीर प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवरच निश्‍चित करावी, अशी मागणीदेखील आम्ही करणार, असल्याचे देवानंद पवार म्हणाले.      (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख