मिहानमधील आपत्ती व्यवस्थापन केंद्रामुळे टाळता येईल शेतकऱ्यांचे नुकसान...

भंडारा, गडचिरोली आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस पडला नाही. त्यामुळे त्या भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस लवकर न आल्यास या भागात कृत्रिम पाऊस पाडण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल.
मिहानमधील आपत्ती व्यवस्थापन केंद्रामुळे टाळता येईल शेतकऱ्यांचे नुकसान...
Vijay Wadettiwar

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याचे अंदाज चुकत आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना जसा बसतो, त्याहूनही अधिक शेतकऱ्यांना बसतो. अतिवृष्टीमुळे नुकसान टाळण्यासाठी आणि पीक नुकसानीच्या अचूक सर्वेक्षणासाठी मिहानमध्ये १० एकरात अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यात येणार आहे. इस्राईलच्या धर्तीवर हे केंद्र विकसित केले जाणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. Relief and rehavilitation minister Vijay Wadettiwar. 

सिव्हिल लाइन येथील रविभवनात त्यांनी पत्रकारांनी ही माहिती दिली. पावसाबाबत हवामान खात्याचे अंदाज चुकत आहे. त्यामुळे भारतातील सर्वात अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र मिहानमध्ये येत्या ५ ते ६ महिन्यांत सुरू होणार आहे. यासंदर्भात प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून, यावर १६०० कोटी रुपये खर्च होणार असून केंद्र शासनाकडून मदत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या केंद्रामुळे हवामानाची अचूक माहिती मिळेल. किती वाजता पाऊस पडेल, किती वेळ पडेल, यासंदर्भात माहिती आधीच कळेल. त्यामुळे अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यास शासनाला तशा उपाययोजना करणे सोयीचे जाईल. अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान होते. परंतु पंचनामे सदोष असतात. त्यामुळे गरजूंना मदत पोहोचण्यात अडथळे येतात. या केंद्राच्या माध्यमातून पीक सर्वेक्षण करून शासनाला वेळेवर मदत करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

दरड कोसळले, मृतकांना पाच लाखांची मदत 
गेल्या २४ तासांत मुंबईतील सांताक्रुज, चेंबूर परिसरात २३४ ते २७० मिमी पाऊस पडला. चेंबूर, विक्रोळी, भांडूपमध्ये दरड कोसळून २१ लोकांचा मृत्यू झाला. मृतकांना एफडीआरमधून ४ लाख तर मुख्यमंत्री सहायता निधीतून १ लाख अशी पाच लाखांची मदत देण्यात येईल. तसेच ज्यांची घरे पडली आहेत, त्यांना ९५ हजारापर्यंत मदत दिली जाईल. तातडीची मदत म्हणून 10 हजार व शिधा देण्यात येईल, असेही ते म्हणाले. 
 

नागपूर, चंद्रपूरला अत्याधुनिक बंब देणार.. 
आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे आगीवर नियंत्रणासाठी अत्याधुनिक १९ बंबांची खरेदी करण्यात आलेली आहे. एक वाहन २ कोटी ६० लाखांचे आहे. हे वाहन अत्याधुनिक असून, आग लागल्यानंतर ज्या भागात गाडी जाऊ शकत नाही, त्यासाठी हे वाहन उपयुक्त ठरणार आहे. २०० मीटरपर्यंत पाण्याचा फवारा या बंबामार्फत करता येणार आहे. नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकेला प्रत्येकी एक वाहन देणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. 

कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत विचार..
भंडारा, गडचिरोली आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस पडला नाही. त्यामुळे त्या भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस लवकर न आल्यास या भागात कृत्रिम पाऊस पाडण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल, असेही वडेट्टीवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in