जागा बळकावण्यासाठी संस्थाचालकाने दिली प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना धमकी - the director threatened the primary education officer to grab the plot | Politics Marathi News - Sarkarnama

जागा बळकावण्यासाठी संस्थाचालकाने दिली प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना धमकी

योगेश बरवड
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. खैरे मात्र सातत्याने ही जागा आपल्या संस्थेला मिळावी, यासाठी प्रयत्नरत होते. त्यासाठी ते वंजारी यांच्यावर सातत्याने दबावही आणत होते. यामुळेच वंजारी यांनी त्यांचा फोन घेणेही बंद केले. २३ ऑक्टोबर रोजी रात्री खैरे यांनी अनोळखी क्रमांकावरून एसएमएस पाठवून जीवे मारण्याची, नुकसान पोहोचविण्याची आणि बदनामी करण्याची धमकी दिली.

नागपूर : जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना शिक्षण संस्थाचालकाने धमकावल्याची घटना उघडकीस आली आहे. शाळेची जुनी संपूर्ण जागा मिळावी, यासाठी संस्थाचालकाकडून सातत्याने दबाव टाकला जात होता. फोनला प्रतिसाद देत नसल्याने त्याने एसएमएस पाठवून धमकावल्याचे वंजारी यांनी सदर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

महादेव खैरे असे आरोपीचे नाव आहे. ते नामदेवराव खैरे मल्टिपरपज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मागील वर्षी कामठीच्या कन्टोनमेंट परिसरातील शारदा मिशन स्कूल ऑफ होम सायन्स ही शाळा आपल्या संस्थेकडे हस्तांतरित करून घेतली. या शाळेचे अवंतिका स्कूल ऑफ होम सायंस असे नव्याने नामकरण करून घेतले आहे. २०१७-१८ या सत्रापासून बंद असलेल्या या शाळेची संपूर्ण जागा आपल्या संस्थेला मिळावी, यासाठी खैरे यांचा लेखी पाठपुरावा सुरू होता. दरम्यान, कन्टोनमेंट बोर्डकडूनही या जागेची मागणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेनेही कन्टोनमेंट बोर्डालाच जागा देण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर केला. 

तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. खैरे मात्र सातत्याने ही जागा आपल्या संस्थेला मिळावी, यासाठी प्रयत्नरत होते. त्यासाठी ते वंजारी यांच्यावर सातत्याने दबावही आणत होते. यामुळेच वंजारी यांनी त्यांचा फोन घेणेही बंद केले. २३ ऑक्टोबर रोजी रात्री खैरे यांनी अनोळखी क्रमांकावरून एसएमएस पाठवून जीवे मारण्याची, नुकसान पोहोचविण्याची आणि बदनामी करण्याची धमकी दिली. वंजारी यांनी सदर ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला आहे.    (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख