नागपूर : पूजा चव्हाण मृत्युप्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विविध आरोप झाल्यानंतर २३ फेब्रुवारीला पोहरादेवी येथे त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तेथे मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर गर्दीतील १० हजार लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गर्दीच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करणार का, असे आज पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना विचारले असता, त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
पुजा चव्हाण मृत्युप्रकरणाबाबत बोलताना डीजी नगराळे म्हणाले, या प्रकरणाचा तपास पुणे पोलिस योग्य पद्धतीने करीत आहेत. त्यांच्या तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार पुणे पोलिस योग्य तो निर्णय घेतील. त्या तपासावर बोलणे योग्य ठरणार नाही. चित्रा वाघ यांना पुण्यातील पोलिस ठाण्यातून अक्षरशः हाकलून देण्यात आले. याबाबत बोलताना ते म्हणाले, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रकार आजच माझ्या लक्षात आणून दिला. पोलिसांनी जर असे केले असेल तर ते योग्य नाही. कुणालाही पोलिस ठाण्यात, डीसीपी कार्यालय, आयुक्त कार्यालय किंवा महासंचालक कार्यालयात निवेदन द्यायचे असेल, तर ते देता येते. प्रत्येक नागरिकाचा किंवा कोणत्याही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा तो अधिकार आहे.
चित्रा वाघ यांच्यासोबत असा प्रकार घडला असेल तर चुकीचे आहे. घडल्या प्रकाराची चौकशी केली जाईल, कुणी दोषी असेल तर कारवाईसुद्धा केली जाईल. मुंबईत एका खासदाराने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिस तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राठोड यांच्या पोहरादेवी येथे झालेल्या कार्यक्रमातील गर्दीमुळे समर्थकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात येईल का? या प्रश्नावर उत्तर देताना मात्र त्यांनी टाळाटाळ केली. पूजा चव्हाणचा मृत्यू हा अपघाती मृत्यू आहे. अपघाती मृत्यूचा तपाससुद्धा एखाद्या गुन्ह्याच्या तपासाप्रमाणेच केला जातो. पुणे पोलिस योग्य दिशेने प्रकरणाचा तपास करीत आहेत. तपासाअंती ते कोणत्या निष्कर्षावर पोहोचतात, हे येणारा काळच सांगणार आहे. त्यामुळे आजच त्या प्रकरणावर काही बोलणे योग्य होणार नाही, असेही डीजी हेमंत नगराळे म्हणाले.
Edited By : Atul Mehere

