‘या’ कारणामुळे महापौर गेले नाही बाजार विभागाच्या बैठकीला ? - didn not the mayor go to the market department meeting because of this reason | Politics Marathi News - Sarkarnama

‘या’ कारणामुळे महापौर गेले नाही बाजार विभागाच्या बैठकीला ?

राजेश चरपे 
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

गाडीच्या पार्किंगवरून रंगलेल्या वादाची महापालिकेच्या वर्तुळात चांगलीच चर्चा होती. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले. आम्हाला महापालिकेत नोकरी करायची आहे. एकीकडे महापौर तर दुसरीकडे आयुक्त आहेत. दोघेही आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.

नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त आणि महापौर संदीप जोशी यांच्या कुंडली जुळत नाही की काय, असे आता बोलले जात आहे. कारण, यापूर्वीचे आयुक्त तुकाराम मुढें यांच्यासोबत महापौरांचे अगदी पहिल्या दिवसापासून जमलेच नाही. त्यानंतर आलेले आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासोबत त्यांचे ट्युनिंग जुळेल, असे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना वाटत होते. परंतु त्यांच्यासोबतही जोशींचे अखेर वाजलेच. प्रशासकीय इमारतीच्या पोर्चमध्ये गाडी ठेवण्यावरून महापौर आणि आयुक्तांमध्ये काल वाद झाला. त्यामुळे महापौरांनी बाजार विभागाच्या बैठकीला जाण्याचे टाळले, अशी माहिती आहे. 

बाजार विभागाचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत बैठक बोलावण्यात आली होती. महापौर आल्यानंतर इमारतीच्या पोर्चमध्ये त्यांची गाडी पार्क करून ठेवण्यात आली होती. थोड्याच वेळाने आयुक्त राधाकृष्णन बी. आले. पोर्चमध्ये उभी असलेली गाडी त्यांनी चालकास हटवण्यास लावली. एवढेच नव्हे तर यापुढे येथे गाडी लाऊ नका, असेही चालकाला बजावले. ही बाब चालकाने महापौरांच्या कानावर घातली. त्यामुळे महापौरसुद्धा चिडले. त्यामुळे त्यांनी बैठकीलाच जाण्याचे टाळले, असे सांगण्यात येते.  

गाडीच्या पार्किंगवरून रंगलेल्या वादाची महापालिकेच्या वर्तुळात चांगलीच चर्चा होती. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले. आम्हाला महापालिकेत नोकरी करायची आहे. एकीकडे महापौर तर दुसरीकडे आयुक्त आहेत. दोघेही आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आम्हाला या वादात ओढू नका, असे येथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले. मागील आठवड्यातसुद्धा एका विषयावरून महापौर व आयुक्तांमध्ये चांगलाच वाद झाल्याचे समजते.

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख