‘देवेंद्र फडणवीसांनी नागपूरातील कॅन्सर इन्स्टिट्यूट पळविले औरंगाबादला’ - devendra fadnavis hijacks nagpur cancer institute to aurangabad | Politics Marathi News - Sarkarnama

‘देवेंद्र फडणवीसांनी नागपूरातील कॅन्सर इन्स्टिट्यूट पळविले औरंगाबादला’

केवल जीवनतारे
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

कार्पोरेट कंपन्यांकडून मिळणारा सामाजिक कार्यासाठीचा निधी ही संस्था उभारण्यावर करण्यात आला. या संस्थेचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळेच मेडिकलमधील कॅन्सर इन्स्टिट्यूट औरंगाबाद येथे पळवले. डॉ. कांबळे यांनी हे प्रकरण न्यायालयात नेल्यानंतर बांधकामापुर्वी यंत्रासाठी २० कोटींचा निधी दिल्याची खेळी करून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली.

नागपूर : सन २०१२च्या हिवाळी अधिवेशनात नागपूर मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याची घोषणा तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि भाजपचे नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. आता कॅन्सर इन्स्टिट्यूट हमखास होणार, असा पक्का विश्‍वास जनतेला होता. पण झाले उलटेच. त्यांनी येथील कॅन्सर इन्स्टिट्यूट औरंगाबादला पळविले. येथे खासगी कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारायचे असल्याने मेडिकलमधील इन्स्टिट्यूट पळवल्याचा आरोप विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य विभाग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष त्रिशरण सहारे यांनी केला आहे. 

भाजप सरकारने पाच वर्षें वेगवेगळ्या खेळींतून कॅन्सर इन्स्टिट्यूटचा प्रश्न रेंगाळत ठेवला. ८ वर्षे लोटून गेल्यानंतरही मेडिकलमधील कॅन्सर इन्‍स्टिट्यूट कागदावरच आहे. विशेष असे की, प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्यानंतर न्यायालयाने २१ जून २०१७ रोजी दोन वर्षात कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्यात यावे, असे निर्देश दिले होते. न्यायालयाचा अवमान झाल्यानंतरही अद्याप कॅन्सर इन्स्टिट्यूट आकाराला आलेले नाही. मध्यभारतात कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या रुग्णांसाठी बहुप्रतिक्षित मेडिकलमधील "कॅन्सर इन्स्टिट्यूट' उभारण्यासाठी मेडिकलमधील तत्कालिन डॉक्टर कृष्णा कांबळे यांनी दहा ते बारा प्रस्ताव तयार केले. पॉवरपॉंईट प्रेझेंटेशन झाले. या खेळीत ८ वर्षे लोटून गेली. या प्रकरणी विधानसभेत वारंवार हा विषय हाताळला जातो. 

२०१९ मध्ये नव्यानेच झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत रेंगाळत असलेला कॅन्सर इन्स्टिट्यूटचा प्रश्‍न हाताळला. त्यांच्या या कारकिर्दीत बांधकामाला मंजुरी मिळाली असून नागपूर सुधार प्रन्याकडे बांधकामाची जबाबदारी दिली असल्याचे आश्‍वासन पुन्हा एकदा दिले गेले. विशेष असे की, ४५ कोटींचा निधी केंद्राने दिला कॅन्सर संस्थेसाठी दिला होता, तो निधीही मेडिकललगत असलेल्या धर्मदाय संस्थेकडे वळता करण्यात आला. येथे अत्याधुनिक अशी संस्था तयार करण्यात येत आहे, मात्र मेडिकलमधील संस्थेला दुर्लक्षित ठेवण्याचा डाव तत्कालिन शासनाने रचला होता, अशी टिका विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य विभाग कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली. 

कॅन्सर इन्स्टिट्यूट न होण्यास कारण.... 
नागपूरच्या मेडिकलमधील कॅन्सर इन्स्टिट्यूट निर्माण कार्यात अडथळा येऊ नये, यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने ‘स्पेशल टास्क फोर्स'ची स्थापना केली होती. हे टास्क फोर्स फडणवीस सरकारमध्ये कुठे हरवले, हे माहित नाही. मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्यासाठी जागा निश्‍चित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. निधीची सोय झाल्याचे सांगण्यात येते. मात्र मेडिकलमधील कॅन्सर इन्स्टिट्यूट न होण्यामागे एक वेगळेच कारण असल्याची चर्चा नागपुरात आहे. नागपुरात एका संस्थेच्या माध्यमातून सुमारे ३०० कोटीचा निधी खर्चून खासगी कॅन्सर इन्स्टिट्यूट तयार झाले. 

कार्पोरेट कंपन्यांकडून मिळणारा सामाजिक कार्यासाठीचा निधी ही संस्था उभारण्यावर करण्यात आला. या संस्थेचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळेच मेडिकलमधील कॅन्सर इन्स्टिट्यूट औरंगाबाद येथे पळवले. डॉ. कांबळे यांनी हे प्रकरण न्यायालयात नेल्यानंतर बांधकामापुर्वी यंत्रासाठी २० कोटींचा निधी दिल्याची खेळी करून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लश्र घालावे, अशी मागणी त्रिशरण सहारे यांनी केली आहे.

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख