नागपूर : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अचानक घोषित झाल्यामुळे अनेकांची नावे मतदार यादीत नाहीत. आमच्या घरी माझं एकट्याचं नाव मतदार यादीत आलं आहे आणि तिघांची नावं आली नाहीत. अनेक घरांमध्ये चौघांचे अर्ज भरले असताना दोघांचीच नावे यादीत आहेत. पण आता यावर फार काही बोलण्यात अर्थ नाही. कारण निवडणूक जवळपास झाली आहे. निवडणूक आयोगाला कुठेतरी ही यंत्रणा सुधारावी लागेल. अर्ज भरताना परिपूर्ण भरला जातो. त्यामुळे ते नाव यादीत आलेच पाहिजे. अर्ज भरण ही आमची जबाबदारी आहे, तशीच नाव यादीत आलं पाहिजे, ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे, असे फडणवीस म्हणाले.
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही आमची परीक्षा आहे. यामध्ये नक्कीच आम्ही उत्तीर्ण होऊ. यामध्ये आमचाच विजय होणार असल्याचा विश्वास राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शहरातील धरमपेठ पब्लिक स्कूल या मतदान केंद्रावर त्यांनी नुकतेच मतदान केले. तसेच नोंदणी असलेल्या सर्व पदवीधरांनी मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आज पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. त्यामध्ये आतापर्यंत देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री नितीन राऊत, भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Edited By : Atul Mehere

