देशमुख साहेब… कंडक्टर तुटल्यामुळे कधीही सायबर हल्ला होत नाही !

सायबर हल्ल्याने कधीही वायर तुटत नाही. मी त्या खात्याचे काम केले आहे आणि यापेक्षा कितीतरी पट चांगल्या पद्धतीने केले आहे. देशमुखजी, आपल्यालाच तांत्रिक बाबी समजत नाहीये. त्यामुळे आपण कृपया वीज खात्यावर बोलू नये आणि राज्यातील १२ कोटी जनतेला मूर्ख बनवू नये.
Chandrashekhar Bawankule - Anil Deshmukh
Chandrashekhar Bawankule - Anil Deshmukh

नागपूर : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल माझ्याबद्दल एक ट्विट करून ‘आपल्याला तांत्रिक बाबी समजणार नाहीत. आपण आपलं हसं करून घेऊ नका’, असे म्हटले आहे. त्यावर ‘मा. अनिल देशमुखजी आपल्याला वीज खातं कधीच समजणार नाही. कंडक्टर तुटल्यामुळे कधीही सायबर हल्ला होत नाही, असे उत्तर राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. 

मुंबई येथील बत्ती गूल प्रकरण हा तांत्रिक विषय आहे. हा विषय चंद्रशेखर बावनकुळे यांना समजू शकणार नाही. त्यांनी या विषयावर बोलून स्वतःचं हसं करून घेऊ नये, असे ट्विट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दुपारी केले होते. त्याला कालच सायंकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. सायंकाळी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये बावनकुळे म्हणतात, १२ ऑक्टोबरची घटना कोणत्याही स्काडा, एसएलडीसीवर सायबर अटॅक केल्यामुळे झाली नाही. १० ऑक्टोबरपासून वीज खात्याच्या ४०० केव्हीच्या २ वाहिन्या ब्रेकडाऊन झाल्या होत्या. आपल्या अधिकाऱ्यांनी ते ब्रेकडाऊन अटेंड केले नाही. या दोन वाहिन्यांचे लोड तिसऱ्या आणि चौथ्या वाहिनीवर आले होते. तिसरी वाहिनीसुद्धा ओव्हरलोड झाली आणि त्यावर स्पार्किंग झाले आणि तीसुद्धा गेली. चौथ्या वाहिनीवर जेव्हा लोड आले, अन् तीही ब्रेकडाऊन होणार होती, तेव्हा आपल्या ऑपरेटरने ती बंद केली. 

१० ते १२ ऑक्टोबरपर्यंत सायबर अटॅक होत नाही. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेली ही घटना आहे. सायबर हल्ला हा कंडक्टर तुटल्यामुळे होत नाही. सायबर हल्ल्याने कधीही वायर तुटत नाही. मी त्या खात्याचे काम केले आहे आणि यापेक्षा कितीतरी पट चांगल्या पद्धतीने केले आहे. देशमुखजी, आपल्यालाच तांत्रिक बाबी समजत नाहीये. त्यामुळे आपण कृपया वीज खात्यावर बोलू नये आणि राज्यातील १२ कोटी जनतेला मूर्ख बनवू नये. हे आपलं आणि आपल्या सरकारचं अपयश आहे, असे बावनकुळे म्हणाले. 

न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीवर राज्याच्या आयपीएस अधिकाऱ्याने अहवाल तयार केला. त्यात त्याने याचा संबंध चीनशी जोडला. निदान त्या आयपीएस अधिकाऱ्याने केंद्रीय गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क करून खातरजमा करायला हवी होती. केवळ न्यूयॉर्क टाइम्सने छापले म्हणून असा अहवाल तयार करणे चुकीचे आहे. अधिवेशनाच्या तोंडावर अपयश लपवण्यासाठी ऊर्जामंत्री व गृहमंत्री धडधडीत खोटे बोलत असल्याचेही बावनकुळे म्हणाले. आपली स्काडा यंत्रणा सायबर अटॅकच्या लेव्हलला यायला खूप सुधारणा कराव्या लागतील. महाराष्ट्रातील ट्रान्समीशन लाइन ३३ केव्हीपर्यतच आहे. आपण अजूनही मॅन्यूअलीच काम करतो आहो. आमची व्यवस्था अजूनही सायबर अटॅक व्हावा, इतकी मजबूत नाही. स्काडा सिस्टिम सेंटर सबस्टेशन लेव्हलवर आहे. ती सायबर अटॅकच्या लेव्हलवर आणायला ५० हजार कोटी हवेत, असे बावनकुळे म्हणाले. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर १०० युनिटपर्यंत वीज बिल माफी व शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्याचे पाप लपवण्यासाठी देशमुखजींनी हे काहीबाही ठोकून दिले. तीन-तीन दिवस दोन वाहिन्या ब्रेक डाऊन राहतात आणि मंत्री काय करतात, असा सवाल बावनकुळेनी विचारला.  

एमईआरसीने निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव सुबोधकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. यात अनेक तज्ज्ञ सदस्य आहेत. या तिघांच्या समितीने याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. मुंबईला ४०० केव्हीच्या चार लाइन्स येतात. त्यातील दोन लाइन ब्रेक डाऊन होत्या. त्या काय सायबर हल्ल्यामुळे ब्रेक डाऊन झाल्या होत्या काय, त्याचे कंडक्टर याच कारणामुळे तुटले होते काय, असे प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केले. तिसरी लाइन ओव्हर ट्रिपींग होऊन स्पार्कींग व्हायला लागले, तेव्हा अधिकाऱ्यांनी सकाळी ७ ते ९ या वेळेत आवटेज मागितले होते. पण, त्या नंतरही ९ पर्यंत दुरुस्ती झाली नाही. त्यानंतर तिसरी लाइन नादुरुस्त झाली. त्यानंतर कळवा खारघरच्या चवथ्या लाईनवर लोड आले, तेव्हा ती खारघरच्या लाइनमनने मॅन्यूअली बंद केली. यात सायबर अटॅकचा संबंध येतोच कुठे, असेही बावनकुळेंनी गृहमंत्री देशमुख यांना विचारले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com