घोडा पार्किंगच्या मागणीने लावले आरोग्य विभागाला कामाला...

सतीश देशमुख यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांना उक्त आशयाचे पत्र दिल्यानंतर ते पत्र जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयानेही तत्काळ दखल घेत या पत्रावर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मार्गदर्शन मागवले.
Horse
Horse

नागपूर : नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेचे सहाय्यक लेखाधिकारी सतीश पंजाबराव देशमुख यांनी काल घोडा कार्यालयाच्या परिसरात बांधण्याची परवानगी मागणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली. त्यानंतर जिल्हा प्रशासन तत्काळ गतिमान झाले आणि घोडा पार्किंगची मागणी करणाऱ्या देशमुख यांच्या अर्जावर विष्णूपुरी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून अहवाल मागवला. अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी देशमुख यांना तंबी दिली. त्यानंतर त्यांनी आपली मागणी मागे घेतली.

जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांना दिलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटले होते की, ‘मला पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे दुचाकी वाहनाने कार्यालयात येण्यास मला त्रास होत आहे. त्यामुळे मी घोडा खरेदी करायचे ठरवले आहे. घोड्यावर बसून विहित वेळेत येणे मला शक्य होईल व घोडा आणल्यास त्याला बांधण्यासाठी कार्यालयीन परिसरात घोडा बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी, ही विनंती.’ त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागणीनंतर  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून पुढील अहवाल पाठवण्यात आला. अहवालात म्हटले आहे की, ‘सतीश पंजाबराव देशमुख यांना पाठीचा त्रास होत असल्यामुळे टु व्हिलरवर येण्यास त्रास होत आहे. त्यामुळे त्यांनी घोडा खरेदी करून घोड्यावर बसून कार्यालयात येण्याची व कार्यालय परिसरात घोडा बांधण्याची परवानगी देण्यासंबंधीची विनंती अर्ज केलेला आहे. त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की, पाठीच्या कण्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी घोड्यावर प्रवास केल्यास आणखीन आदळ आपट होते व त्यामुळे मनका दबण्याची, मणक्यामधील गादी दबण्याची तसेच सरकण्याची शक्यता असते. त्यामुळे पाठीच्या कण्याचा आजार कमी न होता वाढण्याची दाट शक्यता आहे. 

सतीश देशमुख यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांना उक्त आशयाचे पत्र दिल्यानंतर ते पत्र जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयानेही तत्काळ दखल घेत या पत्रावर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मार्गदर्शन मागवले. त्याला महाविद्यालयाने उपरोक्तप्रमाणे उत्तर दिले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याला तंबी दिली. त्यानंतर त्यांनी आपली घोडा आणण्याची मागणी मागे घेतली. पण तेव्हापासून सोशल मिडियावर या विषयावर चांगलेच चर्वित चर्वण झाले. नेटकऱ्यांनी आपआपल्या पद्धतीने या विषयावरून चांगलेच मनोरंजन केले. 

सोशल मिडियावर आलेल्या काही प्रतिक्रियांपैकी एक प्रतिक्रिया खालीलप्रमाणे -
‘मा.जिल्हाधिकारी यांचे कडून आलेला प्रतिसाद.....!!
१)घोडा खरेदी करण्यासाठी संबंधित विभागाची घेतलेली परवानगी व इतर कागदपत्रे सादर करावी.
२)घोडा हाच प्राणी खरेदी करण्याचे प्रयोजन काय, या चे सविस्तर विवेचन करावे ?
३) घोड्याची रंग, उंची, लांबी किती असेल या बाबत चे सविस्तर माहिती सादर करावी...?
४) वन्यजीव विभागाची परवानगी सोबत जोडावी.
५) घोड्याने केलेली घाण काढण्यासाठी आपण काय नियोजन केले आहे?
६) घोडा बांधण्यासाठी आपण निवडलेली जागेचा नकाशा, उतारा सोबत जोडावा.
७)जागा मालकाचे ना हरकत व परवानगी सोबत जोडावी.
८) घोडा हाताळण्यासाठी चे आपण प्रशिक्षण घेतले आहे का? घेतले असल्यास दाखला सोबत जोडावा.
९) घोडा उधळल्यास जबाबदारी कोणाची राहील हे आपल्या अर्जात नमूद केलेले नाही.
घोडा उधळून इतरांना दुःखापत झाल्यास ती जबाबदारी सर्वस्वी आपली राहील.
१०) घोड्याच्या चाऱ्याची आपण काय व्यवस्था केलेली आहे?
११) आपण पुरवण्यात येणारा घोड्याच्या चाऱ्याची अन्न व औषध विभागामार्फत दररोज तपासणी करून घेणे बंधनकारक राहील.
१२) घोड्यास बांधण्यासाठी तबेला बांधण्यास येणारा खर्च आपणास करावा लागेल.
१३) वन्य जीव हाताळणी कायदा अंतर्गत शेड मधील तापमान नियमित ठेवण्यासाठी तेथे AC बसवावा लागेल.
१४) या व्यतिरिक्त वेळोवेळी इकडील कार्यालयाकडून घोड्या संबंधित निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे आपणास पालन करणे बंधनकारक राहील.
१४) घोडा व घोडा मालकाचा विमा उतरून घेतलेले दस्तावेज सादर करावेत.
१५) वरील सर्व अटींची पूर्तता कराव्यात किंवा आपली मणक्याचे शस्त्रक्रिया करून घ्यावी.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com