दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी एम. एस. रेड्डीला नागपुरातून अटक...

कलम ३०६ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहआरोपी श्रीनिवास रेड्डी ला ग्रामीण एलसीबी टीमकडून नागपुरातून अटक करण्यात आली सध्या रेड्डीला धारणी पोलिस ठाण्यात आणून चौकशी सुरू असून आज दुपारी रेड्डीला धारणी न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे धारणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
Deepali Chavan
Deepali Chavan

अमरावती : उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्यामुळे जगणे असह्य झाले असल्याचे वारंवार सांगूनही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या आणि दीपाली चव्हाण या ‘लेडी सिंघम’ च्या दुर्दैवी आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या अपर मुख्य वन संरक्षक एम. एस. रेड्डी यांनादेखील सहआरोपी करून आज पहाटे धारणी पोलिसांनी त्यांना नागपुरातून अटक केली आहे. रेड्डीला अटक होणे, हे भाजपाने दिलेल्या तीव्र लढ्याचे यश असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी दिली आहे. 

दीपाली चव्हाणला किमान मरणोत्तर न्याय मिळावा म्हणून अमरावतीत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता दीघडे यांच्या नेतृत्वात सातत्याने आंदोलन केले गेले. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ, भाजपा नेते डॉ. सुनील देशमुख, आमदार प्रताप अडसड यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनावर दबाव निर्माण झाला होता. भाजपा महिला आघाडीदेखील रस्त्यावर उतरली होती. रेड्डीची बदली, नंतर निलंबन आणि आज झालेली अटक यासाठी भाजपा रस्त्यावर उतरल्याने यश आल्याचे शिवराय कुळकर्णी म्हणाले.

रेड्डी यांना वाचवण्यासाठी अनेक उच्चपदस्थ अधिकारी एकत्रित आले होते. भाजपाने दबाव उभा केला नसता तर रेड्डीला स्थानिक पोलिसांनी क्लीन चिट दिलेली होती. एकीकडे रस्त्यावर आंदोलन करणे तर दुसऱ्या बाजूला रेड्डी विरोधात पुरावे देखील उपलब्ध करून देण्याचे काम भाजपने केले. दोन दिवसांपूर्वीच शिवराय कुळकर्णी यांनी स्वतः रेड्डी प्रकरणी तपास सोपवलेल्या अपर पोलीस महासंचालक आयपीएस डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्यासमोर सबळ पुराव्यांसह बाजू मांडली होती. अधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे दीपाली चव्हाणला आपले प्राण गमवावे लागले. हे न भरून निघणारे नुकसान आहे. पण पुन्हा कोण्या दीपालीला आपले प्राण गमवावे लागू नये, म्हणून आमचा लढा असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर दबंग कामगिरी बजावत असलेल्या दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीवर नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने नागपुरातच ही कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यापासून श्रीनिवास रेड्डी हे अटक टाळण्यासाठी लपून छपून फिरत होते. काल रेड्डी यांचे लोकेशन नागपुरात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांची एक टीम नागपुरात दाखल झाली. यानंतर पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखा आणि स्थानिक सायबर सेलच्या मदतीने रेड्डीची शोधाशोध सुरू केली. या शोधमोहिमेत पोलिसांना यश आलं असून त्यांनी श्रीनिवास रेड्डीला अटक केली आहे.

महिनाभरापूर्वी श्रीनिवास रेड्डींचे निलंबन
आरएफओ दीपाली चव्हाण यांनी आपण वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची एक सुसाईड नोट लिहिली आणि गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर डीएफओ विनोद शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावरून तात्काळ अटक करण्यात आली. तसंच त्यांचं निलंबनही करण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांनी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांची उचलबांगडी करण्यात आली होती. तर महिन्याभरापूर्वी रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले होते.

आज न्यायालयात करणार हजर
कलम ३०६ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहआरोपी श्रीनिवास रेड्डी ला ग्रामीण एलसीबी टीमकडून नागपुरातून अटक करण्यात आली सध्या रेड्डीला धारणी पोलिस ठाण्यात आणून चौकशी सुरू असून आज दुपारी रेड्डीला धारणी न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे धारणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com