दीपालीच्या आरोपींना शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही : यशोमती ठाकूर - deepali accused will not recover till sentencing said yashomati thakur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

दीपालीच्या आरोपींना शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही : यशोमती ठाकूर

अरुण जोशी
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ होण्याच्या घटना यापुढे कुठेही होऊ नये, यासाठी या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी व दोषींना शिक्षा ठोठावण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करू. महाराष्ट्रात भगिनी अनेक क्षेत्रांत आघाडीने कार्यरत आहेत.

अमरावती : दीपाली चव्हाणला न्याय मिळवून देण्यासाठी, दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा होत आहे. या प्रकरणी जबाबदार अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या निलंबनानंतर आता त्यांना अटकही करण्यात आली आहे. याबाबत आपण मेळघाटात दौरा करून वन कर्मचा-यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे यंत्रणेकडे सादर केले आहे. या प्रकरणी जबाबदार प्रत्येक दोषीला कठोर शिक्षा होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू, असे महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले.

दिवंगत अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक व तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली. यापुढे असा प्रकार घडू नये, म्हणून प्रकरणातील सर्व दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी सतत प्रयत्नरत राहू, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केली. आहे.

हेही वाचा : मोफत कोरोना लसीकरणाचा मुहूर्त महाराष्ट्रदिनाचा ठरला पण लस मिळणार नाही!

या प्रकरणी जबाबदार अधिका-यांना निलंबित करण्याबाबत पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती व त्यानुसार रेड्डी यांचे निलंबन झाले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी मेळघाटात दौरा करून महिला वन अधिकारी व कर्मचा-यांच्या ठिकठिकाणी सभा घेतल्या व त्यांची व्यथा जाणून घेतली. याबाबतची माहिती वेळोवेळी चौकशी समितीच्या अध्यक्ष अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांना दिली. त्यामुळे चौकशीने वेग घेतला असून रेड्डी यांना अटक करण्यात आली आहे.

सखोल चौकशीसाठी प्रयत्नरत
कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ होण्याच्या घटना यापुढे कुठेही होऊ नये, यासाठी या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी व दोषींना शिक्षा ठोठावण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करू. महाराष्ट्रात भगिनी अनेक क्षेत्रांत आघाडीने कार्यरत आहेत. अशा ठिकाणी त्यांना काम करताना संरक्षक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. कुठेही अपप्रकार घडत असेल तर महिलांनीही निर्भीडपणे पुढे  येऊन तक्रार करावी. मी रोज सर्व तक्रारींचा आढावा घेत आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख