आदिवासींना तीस हजार हेक्टर जमीन मिळवून देणारे मारोतराव वंजारे यांचे निधन - death of marotrao wanjare who gave thirty thousant land to tribals | Politics Marathi News - Sarkarnama

आदिवासींना तीस हजार हेक्टर जमीन मिळवून देणारे मारोतराव वंजारे यांचे निधन

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 30 मार्च 2021

त्यांनी प्रसंगी न्यायालयात युक्तिवाद केला. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, माजी मंत्री मनोहर नाईक यांच्यासोबत त्यांनी आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. अखेरच्या श्वासापर्यंत आदिवासींच्या हितासाठी लढा दिला. त्यांचा आदिवासी सेवक म्हणून राज्य शासनाने गौरव केला आहे.

पुसद (जि. यवतमाळ) : आदिवासी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, आदिवासी सेवक मारोतराव वंजारे ८९ व्या वर्षी अल्पशा आजाराने आज निधन झाले. त्यांच्या निधनाने आदिवासी समाजाची संघर्षयात्रा थांबली आहे. आदिवासींसाठी संघर्ष करताना त्यांनी ३० हजार हेक्टर जमीन समाजबांधवांना मिळवून दिली आहे. 

मारोतराव यांचा जन्म पुसद तालुक्यातील माणिकडोह येथील आदिवासी कुटुंबात झाला. केवळ चौथा वर्ग शिक्षण झाले असले तरी त्यांचा आदिवासी कायद्याचा अभ्यास दांडगा होता. सुरुवातीच्या काळात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासमवेत त्यांनी आदिवासी लोकांच्या उत्कर्षासाठी आदिवासी वाड्यांतून काम केले. कै. वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नामुळे यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी आंध समाजाला न्याय मिळाला. याची जाण करून देत आदिवासी कायद्यांबद्दल त्यांनी आदिवासी समाजात जनजागरण केले. विदर्भातील गैर आदिवासींच्या ताब्यात असलेली सुमारे तीस हजार हेक्टर जमीन त्यांनी आदिवासींना परत मिळवून दिली.

यासाठी त्यांनी प्रसंगी न्यायालयात युक्तिवाद केला. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, माजी मंत्री मनोहर नाईक यांच्यासोबत त्यांनी आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. अखेरच्या श्वासापर्यंत आदिवासींच्या हितासाठी लढा दिला. त्यांचा आदिवासी सेवक म्हणून राज्य शासनाने गौरव केला आहे. त्यांनी आदिवासी विकास परिषद दिल्लीचे सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. पुसद येथील जिनिंग-प्रेसिंगचे अध्यक्ष, जिल्हा रोजगार हमी योजना सदस्य, माणिकडोहचे सरपंच, पुसद पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य परिवहन सल्लागार समिती सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्था कारला देवचे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे.

पुसद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते उपाध्यक्ष होते. पुसद येथील महात्मा मुंगसाजी आदिवासी शिक्षण संस्थेचे वीस वर्ष अध्यक्ष होते. जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सदस्य होते. त्यांच्या निधनाने एक सच्चा, स्पष्ट वक्ता आदिवासी कार्यकर्ता हरवला. त्यांनी आपले संपूर्ण जीवन आदिवासी समाजासाठी अर्पण केले. आदिवासी समाजाचे मोठे नुकसान झाले, या शब्दांत माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. माजी मंत्री मनोहर नाईक यांनी आदिवासींबद्दल कळकळ असलेला एक सहकारी गमावला या शब्दात शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्यांच्यामागे दोन मुले, तीन मुली व मोठा आप्तपरिवार आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख