सनदी अधिकाऱ्यांच्या शीतयुद्धात सीपींची एंट्री, अन गंटावारांचा झाला गेम 

डॉ. गंटावार यांच्याकडे ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिकची संपत्ती आहे. अनेक वर्षांपासून गंटावार पालिकेत कार्यरत आहेत. मात्र त्यांना फारसे कोणी ओळखत नव्हते. मुंढे आल्यापासून ते अचानक प्रकाश झोतात आले.
Tukaram Mundhe-upadhyay-ravindra thakre
Tukaram Mundhe-upadhyay-ravindra thakre

नागपूर : उपराजधानीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरू झाली कोरोनाविरोधातील लढाई. मग झालेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांमध्ये शितयुद्ध सुरू झाले. महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यातील शितयुद्धात पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची एंट्री झाली. अन पालीकेतील सत्ताधाऱ्यांचा विरोध असलेले महापालीकेचे आरोग्य अधिकारी डॉ गंटावारांवर कारवायांचे सत्र सुरू झाले. आजपर्यंत कुणाला फारसे माहितही नसलेले डॉ. गंटावार रातोरात चर्चेत आले. तुकाराम मुंढे शहरात आल्यानंतरच अधिकाऱ्यांमधे असे वातावरण झाल्याचेही प्रशासकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

महानगरपालिकेतील अनेक अधिकाऱ्यांच्या तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आहेत. आजवर कोणालाच हात लावण्यात आला नाही. मात्र मुंढे गंटावारांना पाठीशी घालीत असल्याने तत्काळ त्यांची फाईल वर काढण्यात आल्याचे बोलले जाते. कोरोनाच्या उपाययोजना आणि त्याचे श्रेय घेण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. यातूनच पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्यांत मतभेद निर्माण झाले आहेत. मुंढे सर्वांच्या अधिकारावर अतिक्रमण करीत असल्याच्या तक्रारी आहेत. पालिका क्षेत्राच्या बाहेर जाऊनही मुंढे परस्पर निर्णय घेत असल्याने नाराजी आहे. मुंढे कोणत्याही अधिकाऱ्याला विश्‍वासात घेत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्याही अधिकारावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दारू दुकान सुरू करणे आणि बंद करण्यावरून दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये वाद उफाळून आला होता. पहिल्या टप्प्यात आयुक्त मुंढेच्या निर्णयामुळे पोलिस प्रशासनाची चांगली अडचण झाली. याची तक्रार पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचली. त्यानंतर सनदी अधिकाऱ्यांच्या शीतयुद्धात पोलिस आयुक्तांची एंट्री झाली. 

काही मुंढेच्या कार्यशैलीचे समर्थक होते. त्यामुळे दोन गट पडल्याची चर्चा रंगली. मुढे यांनी जिल्हा परिषदेला सभेसाठी भट सभागृह देण्यास नकार दिला. यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरेसह सीईओ योगेश कुंभेजकरही नाराज झाले. महानगरपालिकेतील सत्तापक्ष विरुद्ध आयुक्त असा संघर्ष शिगेला पोचला आहे. यातूनच आयुक्त मुंढे यांच्यावर गैरव्यवहार केल्याची तक्रार सत्ताधाऱ्यांनी पोलिसांकडे केली. सत्ताधाऱ्यांकडून विरोध होणाऱ्या अधिकाऱ्यांना मुंढेनी समर्थन दिले. जिल्हा परीषदेचे सीईओ असतानाही त्यांची कार्यशैली अशाच प्रकारची होती, असेही सांगण्यात येते. त्यामुळेच महापौरांच्या आदेशानंतरही आयुक्त मुंढे यांनी डॉ. गंटावारांचे निलंबन केले नाही. तर दुसरीकडे एसीबीने जुन्या तक्रारीच्या आधारे डॉ. गंटावार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. 

कोंडीत टाकण्यासाठीच एसीबीची धाड? 
डॉ. गंटावार यांच्याकडे ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिकची संपत्ती आहे. अनेक वर्षांपासून गंटावार पालिकेत कार्यरत आहेत. मात्र त्यांना फारसे कोणी ओळखत नव्हते. मुंढे आल्यापासून ते अचानक प्रकाश झोतात आले. महापौरांनी सभागृहात दिलेले निलंबनाचे आदेश, मुंढेंनी निलंबनास दिलेला नकार हा वाद सुरू असतानाच एसबीने गंटावारांच्या घरावर धाड टाकली. त्यावरून मुंढेंना कोंडीत टाकण्यासाठीच एसबीने आपले अस्र उगारल्याचेही काही जाणकारांचे म्हणणे आहे.     (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com