कोरोनाने घेतले भिक्षेकऱ्याला विळख्यात, कनेक्‍शन शोधण्यात प्रशासनाची दमछाक  - corona takes the beggar the administration struggles to find a connection | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाने घेतले भिक्षेकऱ्याला विळख्यात, कनेक्‍शन शोधण्यात प्रशासनाची दमछाक 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 23 मे 2020

बाधितांना मेयो-मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केले. कोरोनाबाधितांची संख्या सुमारे 416 वर पोहचली आहे. शुक्रवारी सेंट्रल ऐव्हेन्यू मार्गावरील महात्मा गांधी चौकात रस्त्याच्या कडेला भिक्षेकरी निपचित पडून होता. त्याची शुद्ध हरपली होती. पोट फुगलेले होते. एका खाकी वर्दीतील पोलिसाने आपले कर्तव्य पार पाडले.

नागपूर : विमान प्रवासाची पार्श्‍वभूमी असलेला, अशी कोरोनाचा विषाणूची ओळख जगभर आहे. परंतु उपराजधानीतील रस्त्यावर बेवारसपणे आयुष्य जगणाऱ्या भिक्षेकऱ्यापर्यंत कोरोना पोहोचला आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या वस्त्यांनी वेढलेल्या परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेला हा भिक्षेकरी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आज आला. भिक्षेकऱ्यासहित शहरात सहा जण कोरोनाबाधित आढळले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

बाधित बाप-लेकांना एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित बाधितांना मेयो-मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केले. कोरोनाबाधितांची संख्या सुमारे 416 वर पोहचली आहे. शुक्रवारी सेंट्रल ऐव्हेन्यू मार्गावरील महात्मा गांधी चौकात रस्त्याच्या कडेला भिक्षेकरी निपचित पडून होता. त्याची शुद्ध हरपली होती. पोट फुगलेले होते. एका खाकी वर्दीतील पोलिसाने आपले कर्तव्य पार पाडले. बेवारस असलेल्या भिक्षेकऱ्याला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) च्या आकस्मिक विभागात दाखल केले. त्याच्यावर योग्य उपचार करण्यात आले. 

उपचारातून बरा होत असताना त्याला श्‍वसनाचा त्रास होत असल्याचे निदान येथील डॉक्‍टरांनी केले. यामुळे या भिक्षेकऱ्याच्या नाकातील व घशातील द्रवाचे नमूने घेण्यात आले. विशेष असे की, शनिवारी सकाळी हा भिक्षेकरी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल मेयोतील प्रयोगशाळेतून पुढे आला आणि मेयोतील आकस्मिक विभागात सेवा देणाऱ्या डॉक्‍टर परिचारिकांमध्ये दहशत पसरली. शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मनोरुग्ण, भिक्षेकरी रस्त्याच्या कडेला पडून असतात. 

मेयोत दाखल करण्यात आलेल्या या भिक्षेकऱ्यापर्यंत कोरोनाचे कनेक्‍शन शोधण्यात प्रशासनाची दमछाक होत आहे. एखाद्याकडून मदत करताना भिक्षेकऱ्याला लागण झाली का, यासंदर्भातील धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. भिक्षेकरी कोरोनाबाधित आढळल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. शनिवारी सहा रुग्ण वाढल्यामुळे उपराजधानीतील रुग्णांची संख्या 416 वर पोहोचली आहे. 

मेयोतील डॉ. रणवीर यादव यांची समयसूचकता 
बेवारस रुग्णांकडे गंभीरतेने बघितले जात नाही. मात्र मेयोतील सीएमओ डॉ. रणवीर यादव यांनी या रुग्णाच्या शरीरावर असलेल्या काही किरकोळ जखमांवर मायेची फुंकर मारत उपचार केले. तशी नोंद घेतली. इतिहास घेतल्यानंतर त्याला उपचारासाठी दाखल केले. विशेष असे की, उपचारादरम्यान त्याला "सारी'च्या वॉर्डात दाखल केले. येथे डॉक्‍टर,परिचारिकांनी सेवा सुश्रूषा करीत या भिक्षेकऱ्याचा जीव वाचवला. तर श्‍वसनाचा त्रास असल्याने "सारी' आजाराची शंका व्यक्त केली आणि त्याचे नमूने कोरोना चाचणीसाठी पाठवले.

डॉ. यादव यांच्या समयसुचकतेमुळेच या रुग्णाचे नमूने घेण्यात आले. अहवाल कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्याच्यावर कोरोना वॉर्डात उपचार सुरू करण्यात आले. या भिक्षेकऱ्याने दोन्ही हात जोडून डॉ. रणवीर यादव यांचे आभार मानले. मेयोत कोरोनाचे स्त्रोत शोधून काढण्यासाठी घेण्यात येत असलेल्या पुढाकारामुळे बरेचवेळा सामुदायिक प्रादुर्भावर रोखण्यात आला. भिक्षेकऱ्याने दोन्ही हात जोडले त्यावेळी डॉ. यादव यांचे डोळे डबडबले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख