corona infiltrates rpf too disrupts a jawan | Sarkarnama

आरपीएफमध्येही कोरोनाचा शिरकाव, एक जवान बाधित 

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 29 मे 2020

पथकातील दोन जवानांना ताप असल्याने त्यांना रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताप तीव्र स्वरूपाचा असून कमी होत नसल्याने दोन दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाच्या तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले.

नागपूर : स्कॉटिंग पार्टीतील जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने रेल्वे सुरक्षा दलात खळबळ उडाली आहे. त्याच्या संपर्कातील जवानांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. अन्य जवानांना संसर्गापासून लांब ठेवण्यासाठी बॅरेकमध्ये सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. 

सदर जवान दौंड येथील पथकाचा सदस्य आहे. गेल्या 3-4 आठवड्यांपासून हे पथक बडनेरा येथे तैनात असून, प्रवासी गाड्यांमध्ये स्कॉटिंगसाठी त्यांना पाठविण्यात येत होते. नागपुरात अजनीतील बॅरेकमध्ये त्यांच्या थांबण्याची व्यवस्था होती. या पथकातील दोन जवानांना ताप असल्याने त्यांना रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताप तीव्र स्वरूपाचा असून कमी होत नसल्याने दोन दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाच्या तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. दोघांचाही तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यातील एक निगेटिव्ह, तर दुसरा पॉझिटिव्ह आढळला आहे. सध्या पॉझिटिव्ह रुग्णावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू असून, दुसऱ्यालाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

बाधित जवानाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती गोळा केली जात आहे. 7 ते 8 जवान त्याच्या निकटच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या सर्वांना रेल्वेच्या अजनीतील क्वारंटाइन हॉलमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांची नागपूर व अमरावतीत तपासणी करून घेण्यात येत आहे. जवानांचे वास्तव्य असणाऱ्या बॅरेकमध्ये कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांचाही शोध सुरू आहे. दोन्ही शिफ्टमध्ये बॅरेकचे सॅनिटायझेशन केले जात आहे. जवानांना आवश्‍यक सूचना देऊन विटॅमिन सीच्या गोळ्या आणि गरम पाण्याचा उपयोग करण्यास सांगण्यात आले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख