बेड आणि रेमडेसिव्हरच्या व्यवस्थापनात समन्वय ठेवा, फायर ऑडिटही करा…

खासगी व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात यावे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयानंतर काल वाडी येथील दुर्घटना घडली. उन्हाळ्याच्या दिवसात आग लागण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात यावे.
Nitin Raut
Nitin Raut

नागपूर : सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. या इंजेक्शनसह रुग्णालयांतील बेड्स आणि लसींच्या उपलब्धतेसंदर्भात सर्व शासकीय, अशासकीय यंत्रणांनी आपसात अधिक समन्वय प्रस्थापित करून प्रभावी व्यवस्थापन करावे, असे आदेश आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी येथे दिले. जिल्ह्यातील शासकीय व खाजगी इस्पितळांचे फायर ऑडिट करण्याचेही आदेश त्यांनी दिले. 

ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी तर शहरासाठी महानगरपालिका आयुक्त यांनी रेमडेसिव्हर इंजेक्शनची मागणी व पुरवठ्यावर नियंत्रण ठेवून गरजूंना ते उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पालकमंत्री म्हणाले की, महामारीचे संकट असताना रेमडेसिव्हर हाच एकमेव रामबाण उपाय समजून खासगी डॉक्टर त्याचा अवाजवी वापर करत आहेत. मात्र रुग्णांना केवळ गंभीर स्थितीतच योग्य प्रमाणात रेमडेसिव्हर वापर झाला पाहिजे. रेमडेसिव्हर खरेदी करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांच्या रांगा दिसून येतात. रुग्णांच्या नातेवाइकांकडून वाढीव किमती उकळण्यात आल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात गरजू रुग्णांना रेमडेसिव्हर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांनी समन्वय ठेवावा. अन्न व औषध प्रशासन विभागानेही दक्ष राहून याबाबत आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्याचे निर्देश डॉ.नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.
 
या बैठकीला आमदार विकास ठाकरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, वनामती प्रशिक्षण संस्थेच्या संचालक मनीषा खत्री, महापालिकेचे अपर आयुक्त जलज शर्मा, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अजय केवलिया, माहिती व जनसंपर्क संचालक हेमराज बागुल, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. देवेन्द्र पातुरकर तसेच पोलीस, महसूल, आरोग्य, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, महानगरपालिका आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी, टास्क फोर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.    

जिल्ह्यातील ग्रामीण भागांत ताप, सर्दी अशी लक्षणे दिसताच लोकांचे दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे रुग्ण गंभीर अवस्थेत शहरात धाव घेत आहेत. काल काही गंभीर रुग्ण अमरावती येथील सुपर स्पेशालीटी हॉस्पिटलला पाठवावे लागले. रुग्णांची वाढती संख्या ही आरोग्य यंत्रणेवर ताण वाढवत आहे. म्हणूनच संसर्ग होताच गाव परिसरातील डॉक्टरांमार्फत तालुकास्तरावरील नियंत्रण कक्षाकडे माहिती जाणे गरजेचे आहे. रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत प्रभावी बेड व्यवस्थापन करण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी विभागीय आयुक्तांना दिले. ग्रामीण भागात शांतता समितीच्या धर्तीवर तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनी तालुकास्तरावर कार्यरत डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांच्याकडून संशयित रुग्णांची माहिती घ्यावी. शहरातही झोननिहाय अशाच पद्धतीची समन्वय यंत्रणा करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

लसीकरण वाढविणे हाच सध्या कोरोना प्रतिबंधाचा मार्ग आहे. कोरोना निर्बंधांच्या काळात लसीकरणाला जाण्यासाठी बस उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना केले. महामारीच्या या कठीण प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  नव्याने रुजू झालेल्या मात्र कर्तव्यपालनात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्यास त्यांनी बजावले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या प्रक्रियेची माहिती त्यांनी घेतली. ही तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सोबतच बाजूच्या परिसरात लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 

खासगी हॉस्पिटलमधील प्रतिनिधींशी पालकमंत्र्यांनी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. खासगी हॉस्पिटलमधील देयके तपासण्याच्या कामावर त्यांनी समाधान व्यक्त केले. देयकांमध्ये पारदर्शकता ठेवावी. महानगरपालिकेच्या अंकेक्षकांकडून अंकेक्षित केलेली देयकेच रुग्णांना द्यावे, असेही ते म्हणाले. रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणाऱ्या ऑक्सिजन सप्लाय सिस्टीमचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले.

खासगी व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात यावे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयानंतर काल वाडी येथील दुर्घटना घडली. उन्हाळ्याच्या दिवसात आग लागण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात यावे. तेथे कार्यरत डॉक्टर, नर्स यांना आग लागल्यानंतर करावयाच्या सुरक्षा उपाययोजनांची माहिती द्यावी. यासंबंधी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिले. कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त घातक आहे. साधारणपणे पुढील २० ते २५ दिवसांत याची तीव्रता भीषण होऊ शकते, असे संकेत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. मास्क व शारीरिक अंतरासोबतच कोविडविषयक नियम आणि निर्बधांचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com