कॉंग्रेसने आधी आपली भांडणे संपवावीत, मग आम्ही ठरवू; राष्ट्रवादीचा टोला... - congress should end its quarrel first then we will decide said ncp | Politics Marathi News - Sarkarnama

कॉंग्रेसने आधी आपली भांडणे संपवावीत, मग आम्ही ठरवू; राष्ट्रवादीचा टोला...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 जुलै 2021

सन २००७ पासून महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. या काळात त्यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. २४ बाय ७ पाणी देण्याची घोषणा यांचीच, पण अद्यापही पूर्ण झालेली नाही. याशिवाय इतरही आश्‍वासने यांनी दिली, ती अर्धवटच आहेत.

नागपूर : पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी सर्वच प्रमुख पक्ष तयारीला लागले आहेत. ही निवडणूक महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रित लढणार, असे बोलले जात आहे. पण कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांनी स्वबळाची भाषा केली आहे. त्यावर ‘आधी तुमची भांडणे तर मिटवा, मग बघू सोबत लढायचे की नाही’, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे City chief of NCP Duneshwar Pethe यांनी कॉंग्रेसला हाणला.

पेठे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट केल्यामुळे महाविकास आघाडी एकत्रितपणे लढेल, असे सध्यातरी वाटत नाही. कारण सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे महापालिका निवडणुकीची तयारी चालवली आहे. यासंदर्भात बोलताना दुनेश्‍वर पेठे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आता कुठलीही गटबाजी नाही. सध्या आमचा एकच नगरसेवक महापालिकेत आहे आणि आगामी निवडणुकीत ही संख्या वाढवून सन्मानजनक आकडा गाठायचा आहे. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. शहराध्यक्षपदी निवड होऊ महिना उलटला तरी कार्यकारिणी तयार झाली नाही, असा आरोप त्यांच्यावर केला जात होता, पण या आरोपाचे खंडन करत कार्यकारिणी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल उद्या नागपुरात येणार आहेत, त्यांच्याशी अंतिम चर्चा करून कार्यकारिणी जाहीर करणार आहे आणि यामध्ये नव्या-जुन्या सर्वांचा समावेश असल्याचेही ते म्हणाले. 

सध्या महानगरपालिकेत पक्षाचे स्थान अगदीच नगण्य आहे. त्यासाठी आम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण वेळ कमी राहिलेला आहे. पण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या दौऱ्याचा आगामी निवडणुकीत फायदा होणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार आहोत. अगदी शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणार आहोत. भारतीय जनता पक्षाकडे संघटन आणि पैसा आहे, तर कॉंग्रेसकडे त्यांची स्वतःची व्होट बॅंक आहे. अशा परिस्थितीत स्वतंत्र लढण्याची वेळ आल्यास आमची पूर्ण तयारी आहे. एकहाती सत्ता जरी नाही मिळवू शकत, तरी कॉंग्रेस आणि भाजपच्या बरोबरीत राष्ट्रवादीला नक्कीच नेऊन ठेवू, असे पेठे म्हणाले.

‘मोठा भाऊ’ आम्हीच...
कॉंग्रेस हा पक्ष मोठा आहेच, त्यात कुणाचंही दुमत असल्याचे कारण नाही. पण हल्लीच्या काळात कॉंग्रेसने नम्रपणा सोडून उद्दामपणा धरला आहे. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस मोठा भाऊ आहे आता महानगरपालिकेतही मोठा भाऊ बनन्याचे प्रयत्न आहेत आणि या प्रयत्नांना वरिष्ठांची साथ आहे. 

आता मी संघटनेचा माणूस...
मी स्वतः लढावे की नाही किंवा त्यानंतरची मोठी निवडणूक लढावी, याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. कारण आता मी संघटनेचा माणूस आहे. पक्षाचे संघटन वाढवण्याची जबाबदारी श्रेष्ठींनी माझ्यावर सोपवली आहे. त्यामुळे स्वतः लढण्यापेक्षा पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून आणता येतील, यावर भर असणार आहे. पक्षाने आदेश दिला तर स्वतःही लढेन, असेही पेठे म्हणाले. 

हेही वाचा : अनंत गुढे म्हणाले, आशिष जयस्वाल हा प्रामाणिक व कट्टर शिवसैनिक, मंत्रिपद मिळेल...

सत्ताधाऱ्यांची फोकनाडबाजी...
सन २००७ पासून महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. या काळात त्यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. २४ बाय ७ पाणी देण्याची घोषणा यांचीच, पण अद्यापही पूर्ण झालेली नाही. याशिवाय इतरही आश्‍वासने यांनी दिली, ती अर्धवटच आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे रस्ते तेवढे झाले. पण रस्त्यांची बरीचशी कामे अजूनही अर्धवट असल्याचा आरोप दुनेश्‍वर पेठे यांनी केला. पाणी कर, गृह कर वाढवला, कोविडची परिस्थिती हाताळण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले. सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या पैशांचा चुराडा करण्याचे काम केले असल्याचा घणाघात करत आता कोणत्या तोंडाने ते जनतेसमोर जातात, हे पहावे लागेल, असेही पेठे म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख