‘कॉंग्रेसने महाविकास आघाडीला सरकारला ‘शॉक’ देण्याची तयारी ठेवावी’ - congress should be ready to shock mahavikas aghadi government | Politics Marathi News - Sarkarnama

‘कॉंग्रेसने महाविकास आघाडीला सरकारला ‘शॉक’ देण्याची तयारी ठेवावी’

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

उर्जामंत्र्यांनी वीजबिल माफी व सवलतीसाठी भरपूर प्रयत्न केलेत. परंतु, त्यांना हवी तशी साथ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांकडून मिळाली नाही. त्यामुळे कॉंग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा हा प्रयत्न दिसतोय.

नागपूर : वाढीव वीज बिलाचा प्रश्‍न राज्यभर पेटतोय. भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत राज्य सरकारला सोमवारपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. या वादात आता काटोलचे माजी आमदार कॉंग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख यांनी उडी घेतली आहे. सरकारने स्वतः दिलेल्या शब्दावरुन फिरणे योग्य नसल्याचे सांगत आता कॉंग्रेसने राज्यातील महाविकास आघाडीला ‘शॉक’ देण्याची तयारी ठेवावी, असे म्हटले आहे. 

लॉकडाऊनच्या ३ महिन्यांच्या काळात जनतेला अवास्तव वाढीव वीज बिले देण्यात आली होती. वीज बिलात माफी अथवा सवलत मिळावी, अशी सर्वांची मागणी होती. त्यानंतर ग्राहकांना दिलासा देणार, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. वीज बिल माफी मिळणार असे चित्र तयार झाले असताना सरकारने आज घुमजाव केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांना जनतेला दिलासा देणे शक्य नव्हते, तर वीजबिल सवलतीची घोषणा का केली, असा रोखठोक सवाल कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केला आहे.

आधी वाढीव बिले कमी करावीत. आधीच वीज दर वाढले आहेत. वाढीव बिलात दिवाळीपूर्वी सवलत देऊ, असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते, परंतु आता सरकारने जनतेला ठेंगा दाखविला आहे. वीज बिलात कोणतीही सवलत मिळणार नाही, असे राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. खरेतर उर्जामंत्र्यांनी वीजबिल माफी व सवलतीसाठी भरपूर प्रयत्न केलेत. परंतु, त्यांना हवी तशी साथ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांकडून मिळाली नाही. त्यामुळे कॉंग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा हा प्रयत्न दिसतोय. जनतेला दिलासा देणाऱ्या घोषणेची पूर्तता करावी, अशी मागणी डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे. वीजबिल माफीवर ठाकरे सरकारचे घुमजाव म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. काँग्रेसने जनतेच्या हितासाठी सरकारला शॉक देण्याची तयारी ठेवावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

(Edited By : ATul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख