नागपुरात कॉंग्रेसचा राजभवनाला घेराव…

ज्या कृषी कायद्यामुळे गेल्या ५० दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर कडाक्याच्या थंडीत आंदोलन करीत आहे. त्यांतील काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तरीही सरकारला पाझर फुटलेला नाही. शेतकरी जगला तर देश जगेल.
rajbhavan Dherao
rajbhavan Dherao

नागपूर : केंद्र सरकारने केलेले काळे कृषी कायदे आणि इंधन दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसने आज शहरातून मोर्चा काढला. मोर्चाने जाऊन राजभवनाला घेराव करण्यात आला. राज्याचे महसूल मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आजचे आंदोलन करण्यात आले.  

आज निघालेला मोर्चा मुंबई येथे नियोजित होता. पण राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी नागपुरात असल्यामुळे आज राजभवनाला घेराव करण्यात आला. शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काल रातोरात कार्यकर्त्यांनी मोर्चाची तयारी केली. आजच्या आंदोलनात बाळासाहेब थोरात यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर, वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री सतीष चतुर्वेदी, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह विदर्भातील कॉंग्रेसचे आमदार, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. सहभागी झाले. काळ्या कृषी कायद्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्याने युवक आणि व्यावसायिक तर गॅस सिलिंडरचे भाव वाढल्याने गृहिणी अडचणीत आल्या आहेत. तरीही केंद्र सरकारला जाग येत नसल्यामुळे आज देशभरात कॉंग्रेसने राजभवनाला घेराव टाकण्याचे आंदोलन केले आहे. 

नागपुरात राजभवनासमोर एकाच ठिकाणी नव्हे तर काटोल नाका चौक, छावणी मार्गासह चारही बाजूंनी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आले आणि घेराव केला. जेथे या आंदोलनाचा समारोप होणार आहे, तेथे आज सकाळपासूनच तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. राजभवनासमोरून होणारी वाहतूक काटोल नाका चौकातून वळवण्यात आली आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांसह महागाईने होरपळलेली जनता, काळ्या कृषी कायद्यामुळे हवालदिल झालेले शेतकरी आणि सिलिंडरच्या भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या. 

राज्यपालांनी करावा कृषी कायद्याचा विरोध
ज्या कृषी कायद्यामुळे गेल्या ५० दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर कडाक्याच्या थंडीत आंदोलन करीत आहे. त्यांतील काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तरीही सरकारला पाझर फुटलेला नाही. शेतकरी जगला तर देश जगेल. त्यामुळे या जगाच्या पोशिंद्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी काळा कृषी कायदा रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांना करणार असल्याचे आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com