कॉंग्रेसने चढवला गडकरींवर हल्ला, म्हणाले आता जनता त्यांना नारळ देईल...

रविवारी पूर्व नागपूरमध्ये ब्लॉक कमेटीच्या बैठकीत कुठलाच राडा झाला नाही. प्रसार माध्यमांनी चुकीची बातमी प्रकाशित केल्याचा दावा विकास ठाकरे यांनी केला.
कॉंग्रेसने चढवला गडकरींवर हल्ला, म्हणाले आता जनता त्यांना नारळ देईल...
Vikas Thakre - Abhijeet Wanjari

नागपूर : मनात येईल ते काम करायचे. ते जनतेच्या उपयोगाचे आहे की नाही, हे तपासून पाहण्याचीही गरज भाजप नेत्यांना BJP's Leaders वाटली नाही. आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचेच काम भाजपच्या काळात नागपुरात झाले आहे. २४ बाय ७ ही तर नागपुरकरांची मोठी फसवणूक आहे, असे एक ना अनेक आरोप करीत कॉंग्रेस नेत्यांनी Congress Leaders आज भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांच्यावर हल्ला चढवला. येत्या महानगरपालिका निवडणुकीत जनता त्यांना नारळ देईल, असे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे म्हणाले. 

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या आवाहनानुसार येत्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांना विकास कामांची पावती म्हणून जनता पदवीधर निवडणुकीप्रमाणे बक्षीस देणार आहे. नारळ हेच फळ भाजपसाठी सर्वाधिक योग्य असल्याची टीकाही आमदार विकास यांनी केली. काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आज एकत्रित पत्रकार परिषद घेऊन थेट गडकरी यांच्यावरच हल्ला चढवला. महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शंखनाद केला. भाजपने पंधरा वर्षे महापालिकेत जो गोंधळ घातला, कोट्यवधींचा चुराडा केला, मनमानी कारभार केला त्याचे फळ म्हणून यंदा जनता त्यांना नारळ देणार आहे. ज्याची गरज नाही, असे कोट्यवधींचे बिनकामाचे प्रकल्प भाजपने आपल्या कार्यकाळात राबवले. यामागचा हेतू काय हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सध्या सर्वाधिक समस्या बेरोजगारीची आहे. 

केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना मिहान प्रकल्प विकसित केला असता तर शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध झाले असता. मात्र भाजपने नागनदी, सिमेंट रोड, सौंदर्यीकरण यातच जास्त स्वारस्य दाखविले. त्यावरून भाजपला सर्वसामान्यांच्या समस्या, प्रश्नासंबंधी त्यांना काही देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होते, असाही आरोप ठाकरे यांनी केला. पत्रकार परिषदेला नवनिर्वाचित पदाधिकारी हैदरअली दोसानी, कमलेश समर्थ, संदेश सिंगलकर, नंदा पराते, अतुल कोटेचा, गिरीश पांडव, प्रशांत धवड आदी उपस्थित होते. 

पारडी पुलाची चौकशी करा 
महामंत्री अभिजित वंजारी यांनी पारडी उड्डाणपूल आणि आउटर सिमेंट रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगितले. सिमेंट रोडवर जागोजागी खड्डे पडले आहेत. पारडी पुलाची डेडलाईन संपली आहे. मात्र कंत्राटदाराला वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. या पुलाने आत्तापर्यंत सात जणांचे बळी घेतले. त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अभिजित वंजारी यांनी केली. 

पाच कोटी कोणी परत केले 
महामंत्री विशाल मुत्तेमवार म्हणाले, मनात येईल तो प्रकल्प राबवण्याचा सपाटा भाजपचा सुरू आहे. तो व्यवहार्य आहे की नाही, त्याचे फायदे, तोटे याचाही विचार केला नाही. नंतर ते प्रकल्प गुंडाळावे लागले. त्यामुळे कोट्यवधीचा चुराडा झाला. कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्पाने गाशा गुंडाळला आहे. एस.एल. ग्रुपची पाच कोटींची बँक गॅरंटी मनपाने कोणाच्या सांगण्यावरून परत केली याचे उत्तर द्यावे, अशी मागणी विशाल मुत्तेमवार यांनी केली. 

बांधा आणि खोदा हाच उद्योग 
महासचिव उमाकांत अग्निहोत्री यांनी सिमेंट रोडच्या कामातील अनियमितता आणि डुप्लिकेशन वर्ककडे लक्ष वेधले. डिप्टी सिग्नल येथे आधी सिमेंट रोड बांधला. त्यानंतर केबल टाकण्यासाठी पुन्हा खोदला. ड्रेनेजमध्ये उभे असलेले ट्रांसफार्मर तसेच ठेवल्याचे सांगितले. भाजप नेत्यांच्या नातेवाइकांचे कंत्राट असल्याने मनपातील अधिकारी चुप्पी साधून असल्याचे त्यांनी सांगितले. 

काँग्रेसला वाटत असल्यास शहराध्यक्ष बदलावा 
मी सात वर्षांपासून शहर काँग्रेस कमेटीचा अध्यक्ष आहो. याबाबत कोणाचेच दुमत नाही. पक्षाला वाटत असेल तर त्यांनी नवीन अध्यक्ष द्यावा. आपली काहीच हरकत नाही, असे सांगून शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी पक्षांतर्गत विरोधकांनाच एक प्रकारे आव्हान दिले. 

अध्यक्ष कोणाला करायचे, कोणाला थांबवायचे याचा निर्णय पक्ष घेत असतो. आपण कोणालाच निर्णय घेण्यापासून रोखले नाही. आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात केंद्रात आणि पाच वर्षे राज्यात भाजपची सत्ता होती. तेव्हा कोणीच शहराध्यक्ष बदलण्याची मागणी केली नाही. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच अध्यक्ष बदलण्याची मागणी केली जात आहे. यालाही काही हरकत नाही. विनाखुर्चीने आपण काम करू शकतो. आमदार म्हणून दक्षिण-पश्चिम नागपूरची जबाबदारी आपल्यावर आहे. याशिवाय नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदी आपली नेमणूक केली आहे. ही नियुक्तीसुद्धा पक्षानेच केली आहे, असे सांगून ठाकरे यांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याचे बोलले जाते. 

नाराजांना दिलासा 
प्रदेश काँग्रेसने अधिकाधिक युवा नेत्यांना संधी दिली आहे. सर्वांना अपेक्षित काही नावांचा त्यात समावेश नसला तरी कार्यकारिणी सर्वसमावेशक आहे. लवकरच तुम्हाला सर्व चेहरे प्रदेश कार्यकारिणीत दिसतील असे सांगून विकास ठाकरे यांनी नाराजांना दिलासा दिला. यावेळी कार्यकारिणीत समावेश नसल्याने नाराज असलेले अतुल कोटेचा, गिरीष पांडव प्रामुख्याने उपस्थित होते. 

वाद नव्हे लोकशाही 
रविवारी पूर्व नागपूरमध्ये ब्लॉक कमेटीच्या बैठकीत कुठलाच राडा झाला नाही. प्रसार माध्यमांनी चुकीची बातमी प्रकाशित केल्याचा दावा विकास ठाकरे यांनी केला. याचवेळी त्यांनी काँग्रेसमध्ये लोकाशाही आहे, सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळेच काँग्रेस जिवंत असल्याचे सांगून बैठकीत गोंधळ झाल्याचे अप्रत्यक्षपणे ठाकरे यांनी मान्य केले.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in