आयुक्त मुंढेंनी निलंबनास नकार दिलेल्या डॉ. गंटावारांवर अपसंपदेचा गुन्हा दाखल 

गंटावार दाम्पत्याच्या रामदासपेठेतील हॉस्पिटलच्या दस्तऐवजांचीही सखोल चौकशी केली. डॉ. प्रवीण गंटावार व त्यांच्या पत्नी डॉ. शिलू गंटावार यांनी लोकसेवक पदाचा गैरवापर करून दोन कोटी 52 लाख 85 हजार 762 रुपयांची अर्थात एकूण वैध उत्पन्नाच्या 43 टक्‍के अधिक अपसंपदा जमविल्याचे चौकशीदरम्यान समोर आले.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

नागपूर : महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण मधुकर गंटावार व त्यांची पत्नी डॉ. शिलू प्रवीण गंटावार यांच्या निलंबनावरुन महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घमासान झाले. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी झडल्या. महापौर जोशींनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. त्यानंतरही आयुक्तांनी निलंबनाची कारवाई करण्यास नकार दिला. या सर्व भानगडी सुरू असताना गैरमार्गाने अडीच कोटी रुपयांची मालमत्ता जमविल्याप्रकरणी लाचजुचपत प्रतिबंधक विभागाने काल रात्री गंटावार दाम्पत्यावर सीताबर्डी पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल गेला. त्यामुळे महापालिका व वैद्यकीय क्षेत्रात्र प्रचंड खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. गंटावार दाम्पत्याने पदाचा गैरवापर करून कोट्‌यवधीची अपसंपदा जमविल्याची तक्रार 2015 मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गंटावार दाम्पत्याविरुद्ध आलेल्या तक्रारीची उघड चौकशी सुरू केली. 2007 मध्ये गंटावार हे महापालिकेच्या इंदिरा गांधी रुणालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होते. 2007 ते डिसेंबर 2015 या कालावधीतील त्यांचे वेतन, उत्पन्न, चल व अचल संपत्ती, मालमत्ता विक्रीपासून मिळालेले उत्पन्न, मुदत ठेवीवरील रक्कम व उत्पन्नाच्या स्त्रोतांची चौकशी करण्यात आली. तसेच महापालिका, संबंधित बॅंक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दुय्यम निंबधक कार्यालय, भारतीय आर्युविमा महामंडळ, मुलांच्या शैक्षणिक संस्थांकडून प्रवीण गंटावार यांच्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने माहिती मागवली. 

गंटावार दाम्पत्याच्या रामदासपेठेतील हॉस्पिटलच्या दस्तऐवजांचीही सखोल चौकशी केली. डॉ. प्रवीण गंटावार व त्यांच्या पत्नी डॉ. शिलू गंटावार यांनी लोकसेवक पदाचा गैरवापर करून दोन कोटी 52 लाख 85 हजार 762 रुपयांची अर्थात एकूण वैध उत्पन्नाच्या 43 टक्‍के अधिक अपसंपदा जमविल्याचे चौकशीदरम्यान समोर आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक रश्‍मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोनाली चौधरी, लक्ष्मण परतेती व गीता चौधरी यांनी गंटावार दाम्पत्याविरुद्ध सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये अपसंपदेचा गुन्हा दाखल केला. 

निलंबनाचे आदेश रोखले 
गंटावर दम्पत्यांचे सर्व गैरव्यवहार ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी महापालिकेच्या सभेत उघडकीस केले होते. त्याचे पुरावेसुद्धा सादर केले होते. त्यानंतर महापौर संदीप जोशी यांनी गंटावर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. मात्र आयुक्त तुकाराम मुंढेंनी गंटावर यांच्यावरील आरोप फेटाळून लावले असून निलंबनास नकार दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com