मुख्यमंत्र्यांची तत्परता : नागझिऱ्यात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना देणार ५ लाख… - cms readiness five lakh to given to the families those who died in nagzira | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांची तत्परता : नागझिऱ्यात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना देणार ५ लाख…

अभिजित घोरमारे
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

मृत मजुरांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असून आगीत जखमी वनमजुरांच्या उपचाराचा खर्च ही शासन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भंडारा : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात  नागझिरा आणि पिटेझरी या दोन वनपरिक्षेत्रात काल अज्ञात इसमाने लावलेली आग विझवताना तीन हंगामी वनमजुरांचा मृत्यू झाला असून दोन वनमजूर जखमी झाले आहेत. मृत मजुरांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असून आगीत जखमी वनमजुरांच्या उपचाराचा खर्च ही शासन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दोन वन परिक्षेत्रांत कक्ष क्रमांक ९७, ९८, ९९, १०० मध्ये आग लागल्याची घटना लक्षात आल्यानंतर जवळपास ६० ते ७० वनकर्मचारी, अधिकारी आणि हंगामी वनमजूर आग विझवण्याचे काम करत होते. सायंकाळी ४ वाजता ही आग आटोक्यात आलीही परंतु ५ वाजता वाऱ्याचा वेग वाढला आणि चार मजुरांना आगीने वेढून घेतले. एक जण खाली उतरण्यात यशस्वी झाला. मात्र तिघे तेथेच अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला. मरण पावलेल्या वन मजुरांमध्ये राकेश युवराज मडावी (वय ४० राहणार थाडेझरी), रेखचंद गोपीचंद राणे (वय ४५) राहणार धानोरी) आणि सचिन अशोक श्रीरंगे (वय २७ राहणार कोसमतोंडी) या हंगामी वनमजुरांचा समावेश आहे. 

विजय तिजाब मरस्कोले (वय ४० राहणार थाडेझरी, ता. सडक अर्जुनी) राजू शामराव सयाम (वय ३० राहणार बोरुंदा) या दोन जखमींवर नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही आग कुणी लावली, याचा शोध अजून लागलेला नाही. गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.

काल दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग विझवण्याचे काम सुरू होते. अधिकारी, कर्मचारी आणि हंगामी वनमजूर असे एकूण ६० ते ७० लोक होते. दुपारी ४.३० वाजता आग आटोक्यात आली. पण ५ वाजता वाऱ्याचा वेग वाढला आणि त्यामुळे आग वेगाने पसरली. मरण पावलेले तिघे पहाडावर होते आणि त्यांना आगीने चहूबाजूने वेढले होते. त्यामुळे त्यांना खाली येता नाही आले. त्यांतील एक जण खाली आला त्याला आम्ही वाचवले. या घटनेनंतर आम्ही जबाबदारी झटकणार नाही. मृतांच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, त्यावर आमची चर्चा सुरू असल्याचे नवेगाव बंध नागझिराच्या उपसंचालक पूनम पाटे आणि उपवनसंरक्षक रामानुजम यांनी सांगितले. 

हेही वाचा : आता मुख्यमंत्र्यांनी ‘माझा व्यवसाय माझी जबाबदारी’ हा उपक्रम राबवावा...

मदतीसाठी हात सरसावले...
मृतांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे मदत जाहीर करण्यात आली आहे आणि जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार करणार आहे. पण अशा संकटात जखमींनासुद्धा आर्थिक मदतीची गरज आहे. यासाठी वनअधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या स्तरावर जखमींना मदत करण्याचे ठरवले आहे. तशी तयारीही त्यांनी सुरू केली असून लवकरच ते ही मदत त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवणार आहेत.  
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख