मुंढेंच्या कर्तव्यनिष्ठेवर भाळले नागरिक, तर राजकीय नेते मारताहेत बोंबा 

अनेक निर्णयांमध्ये तुकाराम मुंढेंनी महापालिका पदाधिकाऱ्यांना दूर ठेवले. यातूनच पदाधिकारी व त्यांच्यात दरी वाढत गेली. परिणामी त्यांच्यावर पदाधिकाऱ्यांकडून "हुकूमशहा' असल्याचाही आरोप झाला. पदाधिकारी आरोप करीत असतानाच शहरातील नागरिक मात्र त्यांच्या समर्थनार्थ पुढे येऊ लागले आहेत.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या उपाययोजना तसेच सक्तीने केलेल्या विलगीकरणीकरणामुळे शहरात बाधितांच्या संख्येला आळा बसला. आयुक्तांची कार्यशैली, कर्तव्यनिष्ठा तसेच स्पष्टवक्तेपणावर आता नागपूरकरही भाळल्याचे चित्र सोशल मीडियावर दिसून येत आहे. मात्र, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, महापालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या कार्यशैलीवर बोट ठेवल्याने त्यांच्या समर्थनार्थ नागरिक मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. त्यांच्या चाहत्यांनी उद्या, मंगळवारी व्हॉट्‌सऍपवर "स्टेटस' ठेवून त्यांचे समर्थन करण्याचे आवाहन केले आहे. 

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून संपूर्ण यंत्रणा एकहाती घेतली. त्यामुळे त्यांच्यावर महापालिकेतील पदाधिकारी, राजकीय नेते तुटून पडले आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून शहरातील विलगीकरण केंद्र, नागरिकांची सक्तीने विलगीकरणात रवानगी, कोरोनाचा रुग्ण आढळलेला परिसर त्वरित प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही, याची काळजी घेतली. सरकारने लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतरही त्यांनी शहराच्या दृष्टीने कडक पावले उचलली. परिणामी नागरिकांना मनस्ताप, त्रास सहन करावा लागला. 

अनेक निर्णयांमध्ये त्यांनी सर्व प्रक्रियेपासून महापालिका पदाधिकाऱ्यांना दूर ठेवले. यातूनच पदाधिकारी व त्यांच्यात दरी वाढत गेली. परिणामी त्यांच्यावर पदाधिकाऱ्यांकडून "हुकूमशहा' असल्याचाही आरोप झाला. पदाधिकारी आरोप करीत असतानाच शहरातील नागरिक मात्र त्यांच्या समर्थनार्थ पुढे येऊ लागले आहेत. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्‌सऍपवर त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात त्यांचे फोटो विविध विशेषणांसह पोस्ट करण्यात येत आहे. काल, त्यांच्या समर्थकांनी फेसबुक, ट्विटरवर "वूई सपोर्ट तुकाराम मुंढे' हा हॅशटॅग वापरून आयुक्तांच्या कार्याला समर्थन दिले. उद्या, मंगळवारी त्यांच्या समर्थकांनी व्हॉट्‌सऍपवर त्यांचा फोटो स्टेटसमध्ये ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

समर्थक व विरोधकांत रण 
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी फेसबुक लाइव्हद्वारे नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्या विरोधकांकडून त्यांना ट्रोल करण्यासाठी मोठी "ट्रोलर्स आर्मी'च तयार होती. आयुक्तांच्या लाईव्हदरम्यान अनेक पोस्ट करीत ट्रोलर्स आर्मीने त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंढे समर्थकांनी त्यांच्या पोस्टवर प्रत्युत्तर दिले. एकूणच सोशल मीडियावर समर्थक व विरोधकांत रणकंदन माजल्याचे चित्र होते. याशिवाय विरोधकांनी काही पोस्ट केल्यास समर्थक त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवित आहेत. 

इमेज बिल्डिंगसाठी भाड्याने यंत्रणा? 
आयुक्त तुकाराम मुंढे यांचे दोन ते तीन इन्स्टाग्राम अकाउंट आहेत. फेसबुक, ट्विटरवरही ते दररोज कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तयारी, मिटिंग, नागरिकांत फिरणे यातून त्यांना इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवर पोस्ट करण्यास वेळ कसा मिळतो? असा प्रश्‍नही काहींनी उपस्थित केला. कोरोनाच्या काळातच अचानक सोशल मीडियावर त्यांचे समर्थक कसे "ऍक्‍टिव्ह' झाले? भाड्याने यंत्रणा तर उभी केली नाही ना, अशी शंका अनेकांनी व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com