china's industries hit hard by the Indian government | Sarkarnama

चीनच्या "उद्योगांना' भारत सरकारचा जोरदार धक्का 

राजेश प्रायकर
मंगळवार, 30 जून 2020

विविध ऍपद्वारे भारतीयांच्या घराघरांत चिनी उत्पादने पोचली. परंतु केंद्र सरकारच्या निर्णयामुळे चिनी ऍप मोबाईलमधून "डिलीट' होतील. त्यामुळे चायना सिंड्रोम काढणे शक्‍य होणार असून स्वदेशी उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ काबीज करता येईल. हीच पाऊले आत्मनिर्भरतेकडे जाणारी आहे.

नागपूर : भारत सरकारने नुकतीच चीनच्या ऍपवर बंदी घातली. यापूर्वीपासूनच सोशल मिडीयावर चीनी उत्पादनांच्या विरोधात मोहिम उघडल्याचे बघायला मिळते. भारतीय सोशल मिडीया वापरकर्त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेत आपली उत्पादने भारतात पोहोचविण्याचा चीनचा गुप्त अजेंडा असल्याचे सांगितले जाते. पण ऍपवर बंदी घातल्याने चीनच्या या मनसुब्यावर पाणी फेरले जाणार आहे. विविध ऍपद्वारे बालवयीन तसेच तरुणाईला जाळ्यात ओढून भविष्यातील ग्राहक तयार करण्याच्या चीनच्या "उद्योगांना' केंद्र सरकारने जोरदार धक्का दिला. आता भारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी भारतीय सोशल मिडीयावर चीनच्या तुलनेत वेगाने पावले उचलावी लागणार आहेत. 

चीनने विविध ऍपचा वापर करीत चिनी तंत्रज्ञान, उत्पादनाचा पुरस्कार करणारी पिढी तयार करण्याचे काम केले. चीनचे हे उद्योग म्हणजे सोशल मीडिया मानसशास्त्रीय युद्ध असल्याचे सोशल मीडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी नमूद केले. ऍपच्या माध्यमातून चीनने भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या मानसिकतेवर पकड मजबूत केली. ऍपवरील व्हिडिओतून चिनी उत्पादनाची सवय भारतीयांना लागेल, अशी चीनची गुप्त योजना होती. मात्र आता सरकारने पन्नासावर ऍप बंद केल्याने भारतीय उत्पादकांना चीनची मक्तेदारी संपुष्टात आणण्याची संधीही चालून आली आहे. 

एकेकाळी डोनाल्ड, छोटा भीम ही कार्टून लहान मुलांना आवडत होती. गेल्या काही वर्षांत निंजा, डोरेमॉन या कार्टूनने मुलांच्या मनाचा ठाव घेतला. ही मुले जशी मोठी होत गेली, तसे चीनने विविध ऍप पुढे करीत त्यांच्या मनावरील ताबा कायम ठेवला. या ऍपच्या माध्यमातून येणारे व्हिडिओ चीनचे उत्पादने, कारखान्यातील आकर्षक उत्पादन निर्मितीचा प्रसार करणारे होते, असे पारसे यांनी स्पष्ट केले. एकप्रकारे चीनने साऱ्यांनाच मोहजाळ्यात ओढण्यासाठी "फॅंटसी' तयार केली. आज प्रत्येकाकडे मोबाईल असून चिनी ऍप स्क्रीनवर आहेत. 

यात काही टिकटॉकसारखे आहेतच, शिवाय ऑनलाईन खरेदीचे ऍपही आहेत. यातून चीनची उत्पादने भारतीयांच्या नजरेत भरली. आता ही ऍप बंद झाल्याने चिनी ऍपचे गारुड संपुष्टात येणार आहे. यानिमित्त व्यावसायिकांनी भारतीय सोशल मीडियातून परिपक्व होण्याची गरज पारसे यांनी व्यक्त केली. कोवळ्या वयातील मेंदूवर चीनने त्यांची उत्पादने रुजविण्याचा जो प्रयत्न केला, त्यालाही आळा बसणार आहे. मात्र चायना सिंड्रोम काढण्यासाठी भारतीय उद्योजक, व्यावसायिकांना प्रयत्न करण्याची गरज पारसे यांनी व्यक्त केली. चायना सिंड्रोम हा आर्थिक व्हायरस असल्याची पुस्तीही पारसे यांनी जोडली. 

विविध ऍपद्वारे भारतीयांच्या घराघरांत चिनी उत्पादने पोचली. परंतु केंद्र सरकारच्या निर्णयामुळे चिनी ऍप मोबाईलमधून "डिलीट' होतील. त्यामुळे चायना सिंड्रोम काढणे शक्‍य होणार असून स्वदेशी उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ काबीज करता येईल. हीच पाऊले आत्मनिर्भरतेकडे जाणारी आहे. मात्र उत्पादक, व्यावसायिकांना सोशल मीडिया साक्षर होऊन ऑनलाईन बाजारपेठेसाठी नवनव्या संकल्पना आत्मसात कराव्या लागतील. 
- अजित पारसे, सोशल मीडिया विश्‍लेषक.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख