मुख्यमंत्री संवेदनशील, दिपाली चव्हाणला नक्की न्याय देतील... - chief minister is sensitive will give justice to deepali chavan | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री संवेदनशील, दिपाली चव्हाणला नक्की न्याय देतील...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

यानंतर दुसरी दिपाली चव्हाण होऊ नये, आता तिच्या आईवर मनात काय कालवाकालव होत असेल, हे सांगता येत नाही. मी तिच्या कुटुंबाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून जे काही शक्य होईल ते सर्व करेलच. मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा, यंत्रणा तयार करावी आणि दिपालीसारख्या पीडितांचे कुणीतरी ऐकावे असा आधार तयार करावा.

नागपूर : दिपाली चव्हाणसोबत जे झालं, तर कधीही कुणासोबतही होऊ नये. येथे स्त्री किंवा पुरुष असा विषय नाही. पण एक यंत्रणा अशी असली पाहिजे की, दिपालीसारखा त्रास कुणालाही झाला तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्याय मागितल्यावर ठराविक काळात तो मिळाला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. सायंकाळी ते पत्र मी पाठवणार आहे, असे खासदार सुप्रिया सुळे आज म्हणाल्या. 

खासदार सुळे म्हणाल्या, आपले मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. या घटनेची चौकशी होईलच. दोषींना शिक्षाही मिळेल, पण असे होऊच नये, यासाठी एक यंत्रणा कार्यरत असली पाहिजे आणि मुख्यमंत्री ते करतील असा विश्‍वास आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी काल हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. स्त्री आज कुठल्याही क्षेत्रात मागे नाही, असे आपण म्हणतो, तिच्या कर्तृत्वाचा उदो उदो करतो. मग दिपाली चव्हाण प्रकरण का घडावे? तिचा इतका छळ झाला की, येवढे टोकाचे पाऊल तिला उचलावे लागले. जीव गेल्यानंतरही तिच्या आईप्रति असलेली तिची जबाबदारी, काळजी तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट अधोरेखित होते. 

एका कर्तबगार स्त्रीचा असा अंत समाजमन हेलावणारा आहे. हा एका दिपालीचा प्रश्‍न नाही, तर हा सामाजिक प्रश्‍न आहे. कोणत्याही कार्यालयात, आस्थापनेत वरिष्ठ अधिकारी कनिष्ठांसोबत कसे वागतात. याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक यंत्रणा असली पाहिजे. स्त्री असो वा पुरुष, न्याय मागण्यासाठी एक यंत्रणा असली पाहिजे आणि पीडिताला विशिष्ट वेळेत न्याय मिळाला पाहिजे. आपला महाराष्ट्र फार चांगला आहे. देशभरातील लोकांना महाराष्ट्राच्या कॅडरमध्ये काम करावेसे वाटते. पण अशी घटना होते, तेव्हा मनाला फार वेदना होतात. दिल्लीमध्ये महाराष्ट्रातले पोलिस, महाराष्ट्रातले जिल्हाधिकारी आणि एकंदरीतच यंत्रणेचे नेहमीच कौतुक होते. आम्ही स्वतःच ते करतो. त्यामुळे या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे की, यापुढे अशा प्रकारे कुणाचाही छळ होता कामा नये. वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पिडीत अधिकारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे खासदार सुळे म्हणाल्या.  

मागच्या लोकसभेत मी बिल आणलं होते की, मानसिक स्वास्थ्याकडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. कारण गेल्या महिनाभरात आमच्या संसदेतील दोन खासदारांनी आत्महत्या केल्या. समाज म्हणून आपण याचं चिंतन केलं पाहिजे. आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वाचन, सिनेमा, खेळ किंवा काहीही प्रत्येकाने केले पाहिजे. आत्महत्या हा मार्गच नाही. हे प्रशासनातच होते असे नाही, तर कॉर्पोरेटमध्येही होते. न्यायालयांतही अशा गोष्टी घडत असल्याचे सातत्याने कानावर येत असते. त्याचा पुरावा नाही माझ्याकडे, पण हे थांबवण्याची वेळ आता आली आहे. 

हेही वाचा : दिपाली चव्हाण यांच्या हत्येत नवनीत राणा अप्रत्यक्ष सहभागी आहेत का ?..चाकणकरांचा आरोप

यानंतर दुसरी दिपाली चव्हाण होऊ नये, आता तिच्या आईवर मनात काय कालवाकालव होत असेल, हे सांगता येत नाही. मी तिच्या कुटुंबाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून जे काही शक्य होईल ते सर्व करेलच. मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा, यंत्रणा तयार करावी आणि दिपालीसारख्या पीडितांचे कुणीतरी ऐकावे असा आधार तयार करावा. आपण दिपालीला वाचवण्यात कमी पडलो. पुन्हा महाराष्ट्रातच काय, कुठेही अशी घटना घडू नये, असे म्हणत खासदार सुळेंनी दिपाली चव्हाणला श्रद्धांजली अर्पण केली.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख