नागपूर : नागपूर जेलमध्ये पैसा मोजला की सर्व सोयी मिळतात. जेल कर्मचाऱ्यांनी कैद्यांना चिकन, मटण, दारू पोहोचविल्याच्या घटना आतापर्यंत समोर आल्या होत्या. कुख्यात कैद्यांच्या वाढदिवसाला केकसुद्धा आणून दिला जातो. पण आता ड्रग्ज पोहोचविण्यात येत आहे. काल जेल कर्मचाऱ्यांची झडती घेतली असता, हा गंभीर प्रकार उघडकीस आला. कारागृह प्रशासनाचे याकडे कारागृह प्रशासनाचे या बाबींकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसतेय.
मध्यवर्ती कारागृहात गेल्या अनेक महिन्यांपासून सावळा गोंधळ सुरू आहे. कैद्यांना अमली पदार्थ, ड्रग्स, अफीम, गांजा आणि दारूसुद्धा पोचविली गेल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. काल एका जेल रक्षकाची अंगझडती घेताना त्याच्याकडे चक्क ड्रग्स सापडले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश मधुकर सोळंकी (२८, रा. सहकारनगर) असे आरोपी जेल कर्मचाऱ्याचे नाव आहे.
धंतोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास कर्मचाऱ्यांना ड्युटीसाठी कारागृहात घेण्यात आले. त्यांच्या हालचालींवर जेल अधीक्षकांना संशय आला. त्यामुळे त्यांची कसून झडती घेण्यात आली. त्यांपैकी मंगेश सोळंकी हा झडती घेताना थरथरू लागला. त्याच्यावर जास्तच संशय बळावला. जेल अधीक्षकांच्या उपस्थितीत झडती घेण्यात आली. मंगेशच्या पायातील मोज्यात काहीतरी पुडी आढळून आली. त्यामध्ये पांढऱ्या रंगाचा पदार्थ होता. त्याची तपासणी केली असता कैद्यांच्या मागणीवरून ड्रग्स असल्याचे अधीक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच मंगेशची प्राथमिक चौकशी केली. तो समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्यामुळे त्याची धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. मंगेशला धंतोली पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू केली आहे.
कारागृहात कुख्यात गुंड आणि ड्रग्सचा शौक असलेले गुंड बंदिस्त आहेत. त्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे. ते कारागृहातील जेलरक्षकांना पैसे देण्याचे आमिष दाखवतात. त्याबदल्यात जेलमध्ये दारू, गांजा, एमडी आणण्यास सांगतात. कैद्यांसाठी अमली पदार्थ नेण्याचे अनेक प्रकार आतापर्यंत उघडकीस आले आहे. पैशाच्या लालसेपोटी कारागृहात जेल कर्मचारी अमली पदार्थ पोचवीत असल्याचे समोर आले आहे.
Edited By : Atul Mehere

