चंद्रशेखर बावनकुळेंनी डॉ. नितीन राऊत यांची काळजी करू नये : प्रवीण कुंटे - chandrasekhar bavankule do nott worry about nitin raut said praveen kunte | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रशेखर बावनकुळेंनी डॉ. नितीन राऊत यांची काळजी करू नये : प्रवीण कुंटे

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

त्या पाच वर्षांतील कोराडी प्रकल्पातील ठेकेदारांची चौकशी केली तरीही त्यामध्ये बावनकुळेंचा संबंध दिसून येईल. त्या भ्रष्टाचाराची रक्कम येवढी मोठी आहे की, त्यातून वाढीव वीज बिलांचा मुद्दा निकाली निघू शकेल.

नागपूर : माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विद्यमान ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा फार कळवळा आला आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये राहू नये, बदनाम होऊ नये वगैरे वगैरे सल्ले त्यांना दिले आहेत. बावनकुळेंचे डॉ. राउतांवर असलेले प्रेम हे पूतना मावशीचे प्रेम आहे. त्यांनी डॉ. नितीन राऊत यांची काळजी करू नये, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी बावनकुळेंना दिला आहे. 

चंद्रशेखर बावनकुळेंनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थांबता थांबत नाहीयेत. श्री कुंटे म्हणाले, डॉ. राऊत सक्षम नेते आहेत. त्यांच्या खात्याबाबत सर्व महत्वाचे निर्णय ते घेऊ शकतात. त्यामुळे बावनकुळेंनी कितीही प्रामाणिकपणाचा आव आणला तरी भाजप श्रेष्ठींनी त्यांना उमेदवारी का नाकारली, याचे उत्तर ते स्वतःही अद्याप शोधू शकले नाहीत. विधानपरिषदेच्या वेळीही त्यांना पक्षाने संधी दिली नाही, यावरून पक्षात त्यांची पत काय आहे, हे लक्षात येते. ऊर्जामंत्री म्हणून त्यांनी केलेल्या सर्व भानगडी आम्ही लवकरच बाहेर काढू. उगाच आमच्या नादी त्यांनी लागू नये. त्यांच्याच पक्षाने यापूर्वीच त्यांची चौकशी केली आहे. त्यामुळे आम्हाला आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नये. 

अवैध वाळू उत्खनन केल्याबद्दल रॉयल्टीच्या २ कोटी रुपयांचा दंड भरण्याचा आदेश विधानसभेत झाला होता. तेव्हा महसूलमंत्री एकनाथ खडसे होते. ती दंडाची रक्कम अजूनही भरली गेली नाही आणि त्या दोन कंपन्या कुणाच्या होत्या, बावनकुळेंचा त्यांच्याशी काय संबंध, याचे उत्तर बावनकुळेंनी द्यावे. मंत्री असताना वाळू माफियांना मदत मदत करणाऱ्यांनी आम्हाला तीन महिन्यांची मुदत देण्याची भाषा वापरू नये. त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे त्यांच्या पक्षानेच तयार ठेवले आहेत. म्हणूनच ते आता पक्षात गमावलेली पत परत मिळवण्यासाठी केविलवाणी तडफड करीत असल्याचा घणाघाती आरोपही श्री कुंटे यांनी केला आहे. 

त्या पाच वर्षांतील कोराडी प्रकल्पातील ठेकेदारांची चौकशी केली तरीही त्यामध्ये बावनकुळेंचा संबंध दिसून येईल. त्या भ्रष्टाचाराची रक्कम येवढी मोठी आहे की, त्यातून वाढीव वीज बिलांचा मुद्दा निकाली निघू शकेल. साईबाबा कंपनी कुणाची आणि २० कोटी झाडे लावण्याचे कंत्राट ज्यांना दिले, त्यांच्याशी काय संबंध आहे? ३३ कोटींचे सौंदर्यीकरण आणि झाडे कुठे लावली, याचेही उत्तर चंद्रशेखर बावनकुळेंनी द्यावे, असे आव्हान प्रवीण कुंटे यांनी दिले आहे. 

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख