तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय ही साखळी तुटणार नाही... - the chain will not be break without three weeks of strict lock down | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय ही साखळी तुटणार नाही...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

सध्या कोरोना रुग्णांची संख्या ५ लाख २० हजार आहे. येत्या ८ ते १० दिवसांत ती १० लाखांच्या वर जाणार आहे. त्यावेळी मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कडक लॉकडाऊन करावे का, या संदर्भात उद्याच्या बैठकीच चर्चा होणार आहे.

नागपूर : व्यावसायिक लॉकडाऊनच्या विरोधात आहेत, हे खरे आहे. रोजच्या जगण्याचा त्यांचा विचार केला तर त्यांची भूमिका योग्य वाटते. पण परिस्थिती तशी नाहीये. आपले राज्य आता कडक लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे. तीन आठवड्याचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय कोरोनाची ही साखळी तुटणार नाही, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज येथे म्हणाले. 

काही व्यापाऱ्यांनी सांगितले की तुम्ही काहीही करा, पण सोमवारपासून आम्ही दुकान सुरू करू. पण तसे केल्यास धोका वाढेल. आज झालेल्या बैठकीत आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले की तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय कोरोनाची ही साखळी तोडता येणार नाही. त्यावर ही साखळी तोडण्यासाठी एकदा काय तो निर्णय आपण घेतला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनासुद्धा यासंदर्भातील बैठकीला बोलावण्यात येणार आहे. उद्या झुम कॉलवर मुख्यमंत्री ही बैठक घेणार असल्याचेही ते म्हणाले. 

तीन आठवड्यांचे कडक लॉकडाऊन केल्यानंतर भाजीपाला जरी घ्यायचा असेल तर तो मोठ्या मैदानात सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून घ्यावा लागेल. किराणा दुकानात कुणाला जाता येणार नाही, तर फोनवर ऑर्डर करून घरपोच किराणा मालाचा पुरवठा दुकानदारांना करावा लागेल. हे सर्व शक्य होईल का यावर उद्याच्या बैठकीच चर्चा होणार आहे. त्यानंतर लशींचा तुटवडा, रेमडेसिव्हरचा तुटवडा आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला कमी पुरवठा होत आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांची तत्परता : नागझिऱ्यात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना देणार ५ लाख…

सध्या कोरोना रुग्णांची संख्या ५ लाख २० हजार आहे. येत्या ८ ते १० दिवसांत ती १० लाखांच्या वर जाणार आहे. त्यावेळी मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कडक लॉकडाऊन करावे का, या संदर्भात उद्याच्या बैठकीच चर्चा होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील. लोकल सुरू ठेवावी का? किंवा अटी, नियमावली बदलवून लोकल सुरू ठेवता येईल का, या संदर्भातही उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख