अरविंदच्या मृत्युची सीबीआय चौकशी करा : प्रकाश आंबेडकर 

अरविंद बन्सोड यांच्या मृत्यूचा तपास आधी पोलिस निरीक्षक जलालखेडा करीत होते. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच सखोल चौकशी व्हावी, याकरिता काटोलचे वरिष्ठ उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

लालखेडा (जि.नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील पिंपळधरा येथील 32 वर्षीय अरविंद जनार्दन बन्सोड या युवकाचा पंचायत समिती सदस्य मयूर उमरकर यांच्याशी कथित वाद झाला. त्यातून 27 मे रोजी अरविंदने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्रथम निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. या प्रकरणी मयूर उमरकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेवरून तालुक्‍यातील राजकीय वातावरण भयंकर तापले असून मृत अरविंद हा "युवक बहुजन विकास आघाडी'चा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

प्रारंभी "आत्महत्या', असे ज्या घटनेचे वर्णन केले जात होते, त्या थडीपवनी येथील अरविंद बन्सोड यांच्या मृत्यूच्या घटनेला आता थेट "हत्या' असे म्हटले जाऊ लागल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे. हे प्रकरण आता राजकीय वळण घेताना दिसत आहे. या प्रकरणाच्या माध्यमातून नेमके कुणाला "टार्गेट' केले जात आहे, या संबंधीची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या प्रकरणाची चौकशी "सीबीआय'कडे द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केल्याने हे प्रकरण पुढे काय वळण घेणार, याची चर्चा सुरू झाली आहे. 

"ऍट्रॉसिटी' गुन्हा दाखल 
थडीपवनी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य मिथिलेश ऊर्फ मयूर उमरकर यांची गॅस एजन्सी आहे. अरविंदने त्यांच्या कार्यालयाचे फोटो काढले. या कारणावरून उमरकर व अरविंद यांच्यात वाद झाला. या वादातून अरविंदने कीटकनाशक प्राशन केले, असे सांगतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादारम्यान अरविंद बनसोड याचे 28 मे रोजी रात्री निधन झाले. त्यावरून पोलिस उपविभागीय अधिकारी नागेश जाधव व जलालखेड्याचे ठाणेदार दीपक डेकाटे यांनी उमरकर व इतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला. आता या गुन्ह्याच्या कलमात "अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमा'च्या (ऍट्रॉसिटी) कलमाची वाढ करण्यात आली आहे. 

सामाजिक संघटनांची निदर्शने 
सुरुवातीला आत्महत्येची घटना, असे वर्णन केले जात होते. आता या घटनेचा "हत्या' असा उल्लेख होऊ लागला आहे. अनेक सामाजिक संघटनांनीही यात उडी घेतली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी निवेदने, निदर्शने केली जात आहेत. आरोपी मयूर उमरकर हा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बंडोपंत उमरकर यांचा मुलगा आहे. बंडोपंत उमरकर हे गृहमंत्री अनिल देशमुखांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत. पुढच्या काळात फक्त राजकारण होते, की वस्तुस्थिती उघड होऊन न्यायाची बाजू वरचढ ठरते, हे दिसणार आहे. 

कट असल्याचा नातेवाईकांचा आरोप 
अरविंदची हत्या करण्यात आली असल्याची दाट शक्‍यता दिसत असताना पोलिसांनी आत्महत्या म्हणून या प्रकरणाची नोंद केली, असा नातेवाइकांचा आरोप आहे. अरविंद स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता आणि सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून गोरगरीब जनतेची कामे करायचा. या रागातून त्याची सुनियोजित कट करून हत्या करण्यात आली, असा आरोप अरविंदच्या निकटवर्तीयांकडून करण्यात येत आहे. 

बहुजन आघाडीचे निवेदन 
जलालखेडा पोलिसांची भूमिका संशयास्पद असून, राजकीय पार्श्वभूमीचा प्रभाव असल्याने सुरुवातीला तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली गेली. आठवडा होऊनदेखील संबंधित आरोपींची साधी विचारपूस व त्यांना अटक न केल्याने संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीने निवेदनातून केली आहे. 

सीबीआय तपास व्हावा ः प्रकाश आंबेडकर 
अरविंद बन्सोड याची हत्या झाली असून, पोलिसांमार्फत आत्महत्या झाल्याचे जाणीवपूर्वक पसरविले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केली असल्याचे वृत्त एका पोर्टलने दिले आहे. 

अरविंद बन्सोड या युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच "ऍट्रॉसिटी'चाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. प्रत्यक्षदर्शी आणि संबंधित लोकांचे कलम 164 नुसार बयाणसुद्धा घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पारदर्शी तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 
- राकेश ओला, जिल्हा पोलीस अधीक्षक 

सखोल चौकशी करणार : गृहमंत्री 
या तरुणाच्या मृत्यूची पारदर्शक व नि:पक्षपातीपणे चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अरविंद बन्सोड यांच्या मृत्यूचा तपास आधी पोलिस निरीक्षक जलालखेडा करीत होते. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच सखोल चौकशी व्हावी, याकरिता काटोलचे वरिष्ठ उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मिथिलेश उमरकरवर "ऍट्रॉसिटी'सह आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा आधीच दाखल करण्यात आल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com