सीबीआय व व्हिजिलन्सची कोलारपिंपरीत धाड, महाप्रबंधक गप्प... - cbi and vigilance raid in kolarpipari general manager is silent | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

सीबीआय व व्हिजिलन्सची कोलारपिंपरीत धाड, महाप्रबंधक गप्प...

तुषार अतकरे
शनिवार, 13 मार्च 2021

कोलइंडिया व वेकोलीने उत्खनन झालेल्या कोळशाच्या वितरणाबाबत नियमावली तयार केली आहे. सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच कोळसा खाणीतील काट्यावरून ट्रक भरण्यात येऊ शकतात. मात्र कोलारपिंपरी कोळसा खाणीत नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत ट्रक भरण्यात येत आहे.

वणी (जि. यवतमाळ) ः वेकोलीच्या वणी उत्तर क्षेत्रातील कोलरपिंपरी कोळसा खाणीत सुरू असलेल्या रोडसेलमध्ये प्रचंड अनागोंदी माजली आहे. चांगल्या प्रतीचा कोळसा उचलण्याच्या नादात वितरणाचे ‘टार्गेट’ पूर्ण होत नाही. त्याप्रमाणेच एक हजार टन कोळशाच्या अफरातफर प्रकरणी झालेल्या तक्रारीअंती सीबीआय व व्हिजिलन्सच्या पथकाने काल कोलारपिंपरी खाणीत चौकशी केली. 

कोलारपिंपरी कोळसा खाणीत सातत्याने अजबगजब प्रकार उघडकीस येत आहे. काही दिवसांपूर्वी 968 टन कोळशाची अफरातफर झाली होती. या प्रकरणी नियमाला बगल देत अल्प दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर रोडसेल करिता कोळसा उचलताना चांगल्या प्रतीचा कोळसा ट्रकद्वारे वाहून नेण्यात येत आहे. डीओधारकाची मनमानी व अधिकाऱ्यांचे संगनमत याला कारणीभूत असून उच्च प्रतीच्या कोळशाची होत असलेली नियमबाह्य उचल यामुळे वितरणाचे ‘टार्गेट’ पूर्ण होत नाही.

कोलइंडिया व वेकोलीने उत्खनन झालेल्या कोळशाच्या वितरणाबाबत नियमावली तयार केली आहे. सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच कोळसा खाणीतील काट्यावरून ट्रक भरण्यात येऊ शकतात. मात्र कोलारपिंपरी कोळसा खाणीत नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत ट्रक भरण्यात येत आहे. त्यामुळे ज्या डीओधारकाचा कोळसा शिल्लक आहे, त्यांच्या हितार्थ मुख्य महाप्रबंधक व उपप्रबंधक झटत असल्याचे वास्तव उजागर होत आहे. शुक्रवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) व व्हिजिलन्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोलरपिंपरी कोळसा खाणीत धाडसत्र अवलंबले. कोळशाच्या होत असलेल्या अनागोंदी प्रकाराबाबत चौकशी सुरू आहे. काल रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. पण आजही केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी बोलायला तयार नाहीत. 

सीबीआय व व्हिजिलन्सच्या धाडसत्राबाबत वेकोली उत्तर क्षेत्राचे महाप्रबंधक ईश्वरदास जक्यानी यांना विचारणा केली असता त्यांनी कारवाईला दुजोरा दिला. पण व्यस्त असल्याचे कारण पुढे करीत माहिती देण्याचे टाळले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख