बॅंकेची निवडणूक झाली हायव्होल्टेज, कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांसह दिग्गज आमदारही मैदानात...

या निवडणुकीत दिग्गजांनी उडी घेतल्यामुळे राज्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे. ४ ऑक्टोबरला होणाऱ्या या निवडणुकीची तयारी गेल्या सहा महिन्यांपासूनच सुरू करण्यात आली होती. निवडणूक कार्यक्रम घोषित होताच राजकीय हालचालींना आणखीच वेग आला असून ग्रामीण भागातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.
बॅंकेची निवडणूक झाली हायव्होल्टेज, कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांसह दिग्गज आमदारही मैदानात...
Yashomati Thakur - Khodke - Kadu

अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या Amravati District Central Cooperative Bank संचालक मंडळाची निवडणूक आगामी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या निवडणुकीमध्ये जिह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या All Political Parties नेत्यांनी सहभाग घेतला आहे त्यामुळे ही निवडणूक आता रंगतदार होणार आहे.

गत ११ वर्षांनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होऊ घातली आहे. या अकरा वर्षांत राजकीय घडामोडीत अनेक बदल झाल्याने सहकार क्षेत्रामधील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत यावेळी एका गटात कॅबिनेट मंत्री तर दुसऱ्या गटात राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक दिग्गज निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने या निवडणुकीत आणखीच रंगत वाढली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची यापूर्वीची निवडणूक सन २०१० मध्ये झाली होती. त्यानंतर राजकीय व्देष व अन्य कारणांमुळे तब्बल पाच वर्ष बँकेतील विविध प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने सन २०१० पासून निवडणूकच झाली नाही. त्यामुळे तब्बल ११ वर्ष बँकेवर बबलू देशमुख गटाचे वर्चस्व होते. त्यामुळे विरोधकांची चांगलीच गोची झाल्याने यावेळी पुन्हा सर्वच विरोधक एकत्र आले आहेत. एका गटात कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर तर दुसऱ्या गटात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या समावेश असल्याने दोन्ही गटांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. आज राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार राजकुमार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव संजय खोडके, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे ,भाजप ग्रामीण उपाध्यक्षा निवेदिता चौधरी व माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

मागील दहा वर्षाच्या काळात जिल्हा बँकेत सत्ताधाऱ्यानी अत्यंत अनागोंदी कारभार केला. शेतकऱ्याची बँक समजल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेत शेतकऱ्यांना आंदोलनं, उपोषण करावी लागली. या सर्वांचा हिशोब घेण्यासाठी आपली उमेदवारी असल्याची प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दिली.

राजकारणाचा इतक्या वर्षाचा अनुभव आपल्या पाठीशी आहे. मात्र जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात कधीही सहभागी झाले नव्हते. त्यामुळे एका शेतकऱ्याची पत्नी म्हणून शेतकऱ्यांसाठी आपली उमेदवारी आहे. महिला प्रवर्गातून आपण ही निवडणूक लढवीत असल्याने महिलांचाही चांगला पाठिंबा आपल्याला मिळत असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांनी नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर सांगितलं.

जिल्हा बँकेची होत असलेली ही निवडणूक जिल्ह्याचे सहकार क्षेत्र आणि जिल्हा बँकेच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाची निवडणूक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय खोडके यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सांगितलं. येणाऱ्या काळात निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाल्यानंतर बँकेतील गैरकारभाराबाबत सविस्तर भूमिका मांडणार असल्याची ते म्हणाले.

या निवडणुकीत दिग्गजांनी उडी घेतल्यामुळे राज्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे. ४ ऑक्टोबरला होणाऱ्या या निवडणुकीची तयारी गेल्या सहा महिन्यांपासूनच सुरू करण्यात आली होती. निवडणूक कार्यक्रम घोषित होताच राजकीय हालचालींना आणखीच वेग आला असून ग्रामीण भागातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. अनेक  नेत्यांच्या गुप्त बैठका सुरू झाल्या आहेत.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in