सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालकाने बनवले नातेवाइकांचेही बोगस प्रमाणपत्र  - bogus certificates of relatives also made by the retired deputy director of sports | Politics Marathi News - Sarkarnama

सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालकाने बनवले नातेवाइकांचेही बोगस प्रमाणपत्र 

नरेंद्र चोरे
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

या घोटाळ्याचे मुख्य केंद्र औरंगाबाद असून, तिथे मुख्य सूत्रधार व लाभार्थी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनात मानकापूर पोलिसांचे एक पथक औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे सध्या फरार असलेला मुख्य सूत्रधार व त्याच्या टोळीस कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

नागपूर : बनावट क्रीडा प्रमाणपत्र तयार करून नोकऱ्या बळकावण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. या प्रकरणी सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर आणि क्रीडा अधिकारी महेश पडोळे पोलिस कोठडीत आहेत. त्यांनी आपल्या नातेवाईकांचेही बोगस प्रमाणपत्र तयार केल्याची बाब तपासात पुढे आली आहे. पुढील तपासात यापेक्षाही गंभीर बाबी उजेडात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अटकेतील अधिकाऱ्यांवरील संकट गडद होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. 

बनावट क्रीडा प्रमाणपत्राचा तपास करीत असलेले मानकापूर ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंतच्या तपासात आरोपींकडून बरीच महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. उल्लेखनीय म्हणजे या अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करत कुटुंबीय व नातेवाइकांना फायदा पोहोचविण्यासाठी त्यांच्याच नावाने बोगस प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक केली. या अधिकाऱ्यांनी संगनमत करून नेमकी किती बोगस प्रमाणपत्र बनविली, प्रमाणपत्र कुणाकुणाला दिले आणि यात कोण सहभागी आहेत, याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. 

या घोटाळ्यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर मानकापूर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. सुरुवातीला सांगलीच्या रवींद्र व संजय यांना अटक केल्यानंतर रेवतकर व पडोळे या क्रीडा अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेऊन या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. पोलिसांनी रेवतकर यांची कार व संशयास्पद कागदपत्रे जप्त केली असून, पडोळे यांचीही कार ताब्यात घेण्यात आली आहे. दोघेही येत्या २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. तर न्यायालयीन कोठडीत असलेले सावंत बंधू सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. 

पोलिसांचे पथक औरंगाबादमध्ये 
या घोटाळ्याचे मुख्य केंद्र औरंगाबाद असून, तिथे मुख्य सूत्रधार व लाभार्थी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनात मानकापूर पोलिसांचे एक पथक औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे सध्या फरार असलेला मुख्य सूत्रधार व त्याच्या टोळीस कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख