घाटांवर ‘पीपीई किट’चा काळाबाजार; शोकाकूल नातेवाइकांकडून ५०० वसुली  - black market of ppe kits on ghats rs five recovered from bereaved relatives | Politics Marathi News - Sarkarnama

घाटांवर ‘पीपीई किट’चा काळाबाजार; शोकाकूल नातेवाइकांकडून ५०० वसुली 

राजेश प्रायकर 
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

शहराबाहेरचा असल्याने त्या शोकाकूल मुलाने पित्याचा चेहरा बघण्यासाठी कर्मचाऱ्याने सांगितलेली रक्कम दिली. कर्मचाऱ्यांनी त्याला पीपीई किट दिल्यानंतर वडिलाचा शेवटचा चेहरा बघितला. ही बाब त्याने नागपुरातील त्यांच्या संपर्कातील काही जणांना सांगितल्याने पीपीई किटची विक्री होत असल्याची बाब पुढे आली. 

नागपूर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांकडून आपले वडील, आई, भाऊ, बहीण, आजोबा अथवा अन्य जवळच्या प्रिय व्यक्तीचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी लोक घाटांवर जातात. जगण्याने छळल्यानंतर मेल्यावरही कोरोनामुळे मृतदेहाचेही हाल होतात. हे एव्हाना बरेचदा पुढे आले आहे. पण मृत नातेवाइकांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी घाटांवर गेलेल्या नातेवाइकांनाही लुटण्याचा ‘धंदा’ केला जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. 

काळीज नसलेले आणि भावनाशून्य असलेले काही कर्मचारी पैसे वसूल करीत असल्याचे चित्र पुढे आले आहे. मृताचा चेहरा दाखविण्यासाठी भ्रष्टाचार करीत असलेल्या काही कर्मचाऱ्यांमुळे चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे. 
शहरात दररोज ६० पेक्षा जास्त कोरोनाबळींची नोंद होत आहे. कोरोनाने मृत पावल्याने पार्थिव कुटुंबीयांकडे न देता महापालिकेचे कर्मचारीच घाटावर नेऊन अंत्यसंस्कार करतात. यावेळी केवळ कुटुंबीयांना माहिती दिली जाते. अंत्यसंस्काराच्या वेळी कुटुंबातील एक-दोन सदस्य कर्मचाऱ्याने सांगितलेल्या घाटावर येऊन मृताचा चेहरा बघतात. कुटुंबीयांना अंत्यसंस्काराचीही मुभा नाही. अंत्यसंस्काराचे पवित्र कार्य कर्मचाऱ्यांकडूनच उरकले जाते. 

अंत्यसंस्कार केल्यानंतर मृतापासून कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना पीपीई किट् दिली जाते. एका पार्थिवासाठी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती महापालिकेने केली आहे. हे चारही कर्मचारी दररोज चार ते पाच मृतांवर अंत्यसंस्कार करतात. त्यामुळे महापालिकेकडून दररोज एका कर्मचाऱ्याला चार ते पाच पीपीई किट दिल्या जातात. परंतु, चार ते पाच पीपीई किटचा वापर करण्याऐवजी काही कर्मचारी एक किंवा दोन किटचा वापर करीत असल्याची खात्रीशीर माहिती आहे. 

नुकताच शिल्लक किट्‍स घाटावर आलेल्या नातेवाइकांना प्रति किट पाचशे रुपये याप्रमाणे विक्री करीत असल्याची बाब ८ तारखेला अंबाझरी घाटावर उघडकीस आली. शहरात उपचार घेणाऱ्या जिल्ह्याबाहेरच्या एका बाधिताचा मृत्यू झाला. या मृतासोबत केवळ त्यांचा मुलगा होता. त्याला अंबाझरी घाटावर येण्यास सांगितले. मुलाला पार्थिवाचा चेहरा दाखविण्यात आला. 

परंतु, त्यासाठी त्याला पीपीई किट्‍स उपलब्ध असून ते खरेदी करावे लागेल, असे सांगण्यात आले. शहराबाहेरचा असल्याने त्या शोकाकूल मुलाने पित्याचा चेहरा बघण्यासाठी कर्मचाऱ्याने सांगितलेली रक्कम दिली. कर्मचाऱ्यांनी त्याला पीपीई किट दिल्यानंतर वडिलाचा शेवटचा चेहरा बघितला. ही बाब त्याने नागपुरातील त्यांच्या संपर्कातील काही जणांना सांगितल्याने पीपीई किटची विक्री होत असल्याची बाब पुढे आली. 

हेही वाचा : फेरनोंदणी न झालेल्या ४.५० लाख घरेलू कामगारांनाही शासनाची मदत मिळणार 

घाटांवर पीपीई किट्‍सची कर्मचाऱ्यांकडून विक्रीसंदर्भात अद्यापही कुणाची तक्रार आली नाही. एखाद्या मृताच्या नातेवाइकासोबत असा प्रकार घडला असेल तर त्यासंदर्भात तक्रार केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढे असा प्रकार होऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल. 
- डॉ. प्रदीप दासरवार, 
उपायुक्त, महानगरपालिका.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख