जिल्हाध्यक्ष माया शेरेंच्या नेतृत्वात ऊर्जामंत्र्यांना दाखवले काळे झेंडे ! - black flags were shown to the energy minister under the leadership of district president maya shere | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हाध्यक्ष माया शेरेंच्या नेतृत्वात ऊर्जामंत्र्यांना दाखवले काळे झेंडे !

चेतन देशमुख
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

दुष्काळाच्या बाबतीत शेतकरी आणि वीज बिलाच्या बाबत सामान्य नागरिकांसोबत सरकार नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मोठा असो की लहान प्रत्येकाचे कंबरडे मोडले आहे. या परिस्थितीचा विचार करुन तरी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन वीज बिलात सवलत द्यायला पाहिजे होती.

यवतमाळ : अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र पुन्हा सुरू होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. वाढीव वीज बिलाने जनता त्रस्त आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पक्ष यवतमाळ शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माया शेरे यांच्या नेतृत्वात तहसील चौकात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना काळे झेंडे दाखवले.

महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसने सर्वत्र गाव तिथे आंदोलन अभियानाला सुरुवात केली आहे. आज ३१ ऑक्टोबरला गावागावांत मशाल आंदोलन होणार आहे. याचाच एक भाग म्हणून यवतमाळ येथे मशाल रॅली आयोजित करण्यात आली आहे. डॉ. राऊत या कार्यक्रमाला येत असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना तहसील चौकात काळे झेंडे दाखविले. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, वीज बिल माफ करण्यात यावे, अशी मागणी करीत काँग्रेस नेत्यांना भाजपकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. 

दुष्काळाच्या बाबतीत शेतकरी आणि वीज बिलाच्या बाबत सामान्य नागरिकांसोबत सरकार नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मोठा असो की लहान प्रत्येकाचे कंबरडे मोडले आहे. या परिस्थितीचा विचार करुन तरी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन वीज बिलात सवलत द्यायला पाहिजे होती. पंचनामेसुद्धा व्यवस्थित आणि योग्य वेळेत न केले गेल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्याच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळे अशा सरकारचा आम्ही निषेध करतो, असे भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माया शेरे म्हणाल्या.     (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख