अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून भाजपाचेच षडयंत्र : नाना पटोले - bjps conspiracy to get permission for helipad at ambanis house said nana patole | Politics Marathi News - Sarkarnama

अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून भाजपाचेच षडयंत्र : नाना पटोले

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 मार्च 2021

अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी सापडली. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच त्यांची वैयक्तीक सुरक्षा व्यवस्था असताना ती गाडी तिथपर्यंत पोहचलीच कशी, हा प्रश्न आहे.

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे, पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाहीये. तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानीच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी, यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी सापडली. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच त्यांची वैयक्तीक सुरक्षा व्यवस्था असताना ती गाडी तिथपर्यंत पोहचलीच कशी, हा प्रश्न आहे. २००९ साली अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात ज्याचे नाव समोर आले त्याचा मृत्यू दुस-याच दिवशी झाला होता, याची आठवणही पटोले यांनी करून दिली. राज्यात व देशात असलेल्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ नये, म्हणून भाजपानेच या मुद्यावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला, असेही पटोले म्हणाले.

सभागृहात गोंधळ घालणे येवढेच उद्दिष्ठ विरोधी पक्षाचे होते, हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आले आहे. सचिन वाझे याच मुद्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कितीतरी वेळ वाया घालवला. तपास यंत्रणेवर त्यांनी विश्‍वास ठेवायला पाहिजे. कारण त्यांच्या काळात जी यंत्रणा होती, तीच आतासुद्धा आहे. त्यामुळे त्यांनी सरकारवर विनाकारण आगपाखड करायला नको होती. शेवटी काय सध्या आपला देश म्हणजे केवळ अदानी आणि अंबानीच आहे. अंबानींच्या हेलीपॅडसाठी परवानगी, तोट्यात येत असलेला त्यांचा व्यवसाय आणि बाजारात गडगडत चाललेले त्यांचे शेअर्स हे सर्व सावरण्यासाठी भारतीय जनता पक्षानेच हे षडयंत्र घडविले आहे, असे नाना पटोले म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख