भाजप खासदारांनी पिडितेसोबत लावून दिला मुलाचा विवाह, अन् मिटवले प्रकरण...
Sarkarnama

भाजप खासदारांनी पिडितेसोबत लावून दिला मुलाचा विवाह, अन् मिटवले प्रकरण...

हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर पूजा यांनी आता आपली कुठलीही तक्रार नाही, असं सांगून आपली तक्रार मागे घेतल्याची माहिती आहे. मला खूप भीती वाटली होती आणि त्यामुळे आपण तक्रार दिली होती. आता पंकज यांच्याबद्दल आपली कुठलीही तक्रार नाही असं पूजा यांनी म्हटल्याची माहिती आहे.

वर्धा : भाजपचे खासदार रामदास तडस BJP's MP Ramdas Tadas यांच्या स्नुषेने त्यांच्या मुलावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला होता. हे प्रकरण चांगलेच तापले होते व चर्चेत आले होते. राजकीय वर्तुळातील काही नेत्यांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या होत्या. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस Leader of Opposition Devendra Fadanvis यांनी आजच यावर प्रतिक्रिया दिली होती. यानंतर खासदार तडस यांनी स्वतः त्या पिडितेसोबत मुलाचा विवाह वैदिक पद्धतीने लावून दिला आणि प्रकरण एकदाचे मिटवले.  

वर्धेलगत असलेल्या पिपरी येथील पांडे यांच्या वैदिक विवाह मंडळात त्यांचा विवाह पार पडला. यावेळी खासदार रामदास तडस यांच्यासह परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. या विवाह सोहळ्यादरम्यान परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. खासदार तडस यांनी मुलाची कुठलीही बाजू न ऐकता हा विवाह करून पीडितेला आधार दिल्याची चर्चा यावेळी परिसरात होती. 

पीडितेशी पंकज तडस यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, विवाहाला घरच्यांचा विरोध होता. यामुळे हे दोघे वर्ध्यात वास्तव्यास होते. येथे त्यांच्यात वाद वाढत गेले. शेवटी वाद पोलिसांपर्यंत गेला. मात्र, वर्धा पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने पीडितेने या प्रकरणाची तक्रार पोलिस महानिरीक्षकांकडे केली. तक्रार होताच प्रकरण चर्चेत आले. यात आता खासदारांनी पुढाकार घेत विवाह लावून दिल्याने सध्या हा वाद मिटल्याचे बोलले जात आहे. 

खासदार रामदास तडस यांची सून पूजा हिचा एक व्हिडिओ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट केला होता. त्यामध्ये सुनेने गंभीर आरोप केले होते. तसेच चाकणकर यांच्याकडे सोडवून नेण्याची मागणी केली होती. दरम्यान, खासदार रामदास तडस यांनी या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. या पीडितेशी पंकज तडस यांचा प्रेमविवाह झाला होता. या विवाहासाठी त्यांनी घरच्यांचा विरोधही पत्करला होता. यामुळे हे दोघे वर्ध्यात वास्तव्यास होते. येथे त्यांच्यात वाद वाढत गेले आणि हा वाद पोलिसांपर्यंत गेला. 

३ सप्टेंबरला पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पंकज तडस यांनी काही वर्षांपूर्वी वर्ध्यातील मुलीला लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केले. यात तिला गर्भधारणा झाली. यानंतर तिने लग्नाची गळ घातल्याने तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर ते दोघे देवळीचे घर सोडून वर्धा येथे राहत होते. येथे तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला व तिला बेदम मारहाण करून घरातून हाकलल्याचा आरोप पीडितेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला होता. या तक्रारीवर वर्धा पोलिसांनी काहीच कारवाई करण्यात आली नाही, असे नमूद करून तिने थेट नागपुरात पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. 

रुपाली चाकणकर यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी पूजाचा एक व्हिडिओ ट्विट करत भाजपचे खासदार रामदास त़डस यांच्या मुलावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर तडस यांच्यावर राजकीय दबाव आल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओनंतर अवघ्या १२ तासातच पंकज तडस आणि पूजा हिचा वैदिक पद्धतीने विवाह पार पडला. तक्रार होताच प्रकरण चर्चेत आले. यात आता खासदारांनी पुढाकार घेत विवाह लावून दिल्याने सध्या हा वाद मिटल्याचे बोलले जात आहे.

पूजाकडून तक्रार मागे
हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर पूजा यांनी आता आपली कुठलीही तक्रार नाही, असं सांगून आपली तक्रार मागे घेतल्याची माहिती आहे. मला खूप भीती वाटली होती आणि त्यामुळे आपण तक्रार दिली होती. आता पंकज यांच्याबद्दल आपली कुठलीही तक्रार नाही असं पूजा यांनी म्हटल्याची माहिती आहे.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in